Yuvraj Singh Father Yograj Singh on Dhoni and Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग त्यांच्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल असे काही बोलले ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप ट्रोल होत आहेत. धोनीवर युवराज सिंगची कारकीर्द खराब केल्याचा आरोप होत आहे. मात्र, युवराज सिंगने धोनीबाबत असा कोणताही दावा कधीच केलेला नाही. तो नेहमीच धोनीबद्दल सकारात्मक बोलताना दिसतो.

नुकतीच योगराज सिंह यांनी झी स्विचला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान योगराज यांनी धोनीवर युवराजचे करिअर खराब केल्याचा आरोप केला आहे. धोनीला मी कधीही माफ करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. धोनीबाबत योगराज सिंग म्हणाले, “मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्याने स्वत:चा चेहरा आरशात पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाच्या विरोधात काय केले आहे ते आता समोर येतंय. यासाठी त्याला कधीच माफ करता येणार नाही. मी माझ्या आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत – पहिली, माझ्यावर अन्याय करणाऱ्याला मी कधीच माफ केलं नाही. दुसरे, मी कधीही त्यांना मिठी मारली नाही, जरी तो माझ्या कुटुंबाचा किंवा माझ्या मुलांचा मित्र असला तरीही.”

हेही वाचा – Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू

धोनीवर पुढे ते म्हणाले, “त्या माणसाने (एमएस धोनी) माझ्या मुलाचे आयुष्य खराब केले. युवराज अजून चार ते पाच वर्षे खेळू शकला असता. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग म्हणाले की, युवराज सिंगसारखा खेळाडू कधीच जन्माला आला नाही. फक्त मी नाही सारं जग म्हणतं की त्याला भारतरत्नने सन्मानित करायला हवं. कॅन्सरशी झुंज देत असतानाही त्याने देशासाठी विश्वचषक जिंकला.” युवराजने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, ज्यामुळे भारत या दोन्ही स्पर्धांचा विजेता ठरला. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार धोनी होता.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: निषाद कुमारची रौप्यपदकाला गवसणी, भारतीय सैन्यात भरती होत देशाची सेवा करण्याचं होतं स्वप्न, एका अपघातामुळे राहिलं अपुरं

कपिल देव यांच्यावरही योगराज सिंगचे धक्कादायक आरोप

योगराज सिंह यांनी याच मुलाखतीत १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्यावरही धक्कादायक वक्तव्य केले. १९८१ मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आल्यापासून कपिल देव यांच्याबरोबर योगराज सिंग यांच्या नात्यात तणाव आल्याचा दावा त्यांनी केला. योगराजचा असा विश्वास आहे की कपिलला त्याचा संभाव्य प्रतिस्पर्धी मानून संघातून काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कपिल देव यांच्यावर अन्याय केल्याचा आणि त्यांच्याशी वैर असल्याचा आरोप केला.

योगराज सिंग कपिल देव यांच्याबाबत म्हणाले, “आमच्या काळाचा सर्वकालीन महान कर्णधार कपिल देव… मी त्याला सांगितले होते की तुझी अशी अवस्था करेन की सारं जग त्याला वाईट बोलेल…” आज युवराज सिंगकडे १३ ट्रॉफी आहेत आणि तुझ्याकडे फक्त एक विश्वचषक आहे.

योगराज सिंग यांच्या या धक्कादायक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यावरून योगराज सिंग यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. भारताच्या दोन प्रतिष्ठित कर्णधारांबद्दल अशा भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल अनेक चाहत्यांनी त्यांना कठोर शब्दात सुनावले आहे.