ओंकार वर्तले

तंजावर हा शब्द कानी पडताक्षणीच इतिहासप्रेमी मराठी माणसाचे कान लगेच टवकारले जातात. याला कारणच तसे आहे. इतिहासाचा मागोवा घेतला की तंजावर या दक्षिण भागातील ठिकाणाचा गौरवशाली संदर्भ आपल्याला लागतोच. एकेकाळी मराठी अधिपत्याखाली असलेल्या या दक्षिण भारतातील भूमीने आजही आपले ऐतिहासिक वैभव जपले आहे. म्हणूनच इथल्या भटकंतीत मराठय़ांच्या राजवटीच्या, त्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी विखुरलेल्या दिसतात.

तंजावर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्यचे ठिकाण. अंजन नावाच्या असुराचा वध श्रीकृष्णाने केला म्हणून याचे नाव तंजावर पडले अशी आख्यायिका या भागात सांगितली जाते. कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले तंजावर एक सांस्कृतिक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. अकराव्या शतकाच्या आसपास या भागावर चोल घराण्याने राज्य केले, त्यानंतर नायक व कालांतराने भोसले घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते. पण यातील भोसले घराण्याच्या कालखंडाविषयी मराठी माणसांना विशेष अभिमान आहे. शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी या तंजावरवर राज्य केले. याच भोसले घराण्याचे वंशज आजही तंजावर येथेच राहतात. हा खास मराठी धागा अनेकांना तंजावरच्या भेटीसाठी  प्रोत्साहित करतो. म्हणूनच या भागाची सफर एकदातरी करणे अनिवार्यच आहे.

बृहदेश्वर मंदिर

तंजावर येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘बृहदेश्वराचे अप्रतिम मंदिर! खरे तर मंदिर हा शब्दसुद्धा वर्णन करण्यास कमी पडेल इतका मोठा विस्तार या वस्तूला लाभला आहे. चोल साम्राज्याने साधारण ११व्या शतकात बांधलेले हे मंदिर तत्कालीन वास्तुस्थापत्याचे आणि कलेचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरावे इतके लावण्य यात ठासून भरले आहे. मंदिराचा आवाका आणि पसाराच इतका मोठा आहे की हे मंदिर पाहण्यासाठी अर्धा दिवसही  कमी पडतो. गोपुरं, नंदीमंडप, भव्य  प्रवेशद्वारे, महामंडप, नटराजमंडप, तामिळ लिपीतले अभ्यासपूर्ण शिलालेख आणि शंकराची पिंड अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर कलाकारांनी अक्षरश: कलेची उधळण केलेली दिसते. म्हणूनच मंदिरप्रेमींनी आणि कलाप्रेमींनी आवर्जून पाहावे असे हे मंदिर आहे. भारतातील सर्वात मोठय़ा मंदिराच्या यादीतील एक प्रमुख मंदिर म्हणून बृहदेश्वर ओळखले जाते. हे मंदिर म्हणजे तंजावर भेटीचा आत्माच आहे.

राजवाडा

यालाच स्थानिक भाषेत ‘पॅलेस कॉम्प्लेक्स’ असेही म्हणले जाते. भोसले घराण्याचे वंशज आजही या इमारतीत राहतात. रस्त्यावरील मोठय़ा कमानीतून आत गेलो की शिवरायांचा  देखणा पुतळा दिसतो. येथून पुढे गेलो की संगीत महाल, हँडीक्राफ्ट प्रदर्शन, दरबार हॉल या इमारती दिसतात. दरबार हॉलमधील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. यामध्ये तंजावरच्या भोसले घराण्याच्या सर्व राजांची जुनी चित्रे व त्यांचा इतिहास मांडला आहे. याच भागात असलेली बेल टॉवर म्हणजेच घंटा मिनारची देखणी इमारत तर न चुकता पाहावी अशीच आहे. असे म्हणतात की राजवाडय़ाची ही इमारत नायक राजवटीत बांधली गेली व नंतर याच इमारतीत मराठी सत्तेचे केंद्र होते. त्यामुळे हे ठिकाण मराठीजनांसाठी अभिमानाचे ठिकाण आहे. येथील प्रत्येक दालनात मराठी सत्तेच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा दिसतात. असे हे दक्षिणेकडील तंजावर. मराठय़ांच्या राजवटीशी, इतिहासाशी नाते सांगणारे, शिल्पकलेचा वारसा जपणारे आहे. दक्षिण भारतातील पर्यटनात चुकवूच नये, अशा ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.

सरस्वती महाल ग्रंथालय

भारतीय साहित्याचे वैभव म्हणून गणले गेलेले सरस्वती महाल ग्रंथालय ही इमारत तंजावरमध्ये वेगळाच आब राखून आहे. तामिळ, मराठी, संस्कृत, कन्नड, फ्रेंच, स्पॅनिश आदी विविध भाषांतील ६०,००० हून अधिक दुर्मीळ पुस्तके, ताडपत्रांवरील दुर्मीळ हस्तलिखिते इथे आहेत. हे सर्व एकाच छताखाली मिळणे ही सरस्वती पूजकांसाठी मोठी पर्वणीच आहे. भोसले घराण्यातील सरफोजी राजे (दुसरे) हे या ग्रंथालयाचे निर्माते! भारतीय साहित्याची रुची त्याकाळी किती शिखरावर होती याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे सरस्वती ग्रंथालय.