Fruits That Reduce Colon Cancer Risk: आपण रोज खातो तीच फळं जर तुमचं आयुष्य वाचवू शकत असतील, तर? होय, अगदी खरं! कारण- या फळांमध्ये लपलेलं आहे कर्करोगाविरुद्ध लढण्याचं नैसर्गिक सामर्थ्य. भारतातील नामांकित वैद्यकीय संस्था AIIMS तसेच Harvard व Stanford मध्ये प्रशिक्षण घेतलेले प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी नुकताच एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश केल्याने मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा (कोलन कॅन्सर) धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
डॉ. सेठी यांनी याबाबत एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितले, “हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल तरुणांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसत आहे. पण, काही साधी आणि नैसर्गिक सवयी अंगीकारल्या, तर हा धोका टाळता येतो.” त्यांनी पुढे चार अशी फळं सांगितली, जी पचनसंस्थेला मजबूत ठेवतात, आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात आणि शरीरातील दाह व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्याची ताकद देतात.
‘ही’ ४ फळं रोज खाल्ली तर मोठ्या आतड्याचा कॅन्सर टाळता येतो!
१. सिट्रस फळं
लिंबू, संत्रं, मोसंबी, द्राक्ष ही सगळी फळं केवळ ताजेपणाच देत नाहीत, तर आतड्यांना साफ आणि निरोगी ठेवतात. डॉ. सेठी सांगतात, “सिट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक चांगल्या जीवाणूंची वाढ करतात आणि वाईट घटकांना रोखतात. त्यामुळे आतड्यांतील सूज कमी होते आणि कोलन कॅन्सरचा धोका घटतो.” दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा नाश्त्यात एक संत्रं एवढं पुरेसं ठरू शकतं.
२. किवी
दिसायला छोटंसं, पण कामगिरीत मोठं ठरणाऱ्या किवीमध्ये सॉल्युबल फायबर आणि प्री-बायोटिक्स मुबलक असतात. त्यातील फायबर पचन सुधारतं, बद्धकोष्ठतेचा त्रास रोखतं आणि आतड्यांतील टॉक्सिन्स नैसर्गिकरीत्या बाहेर काढतं. डॉ. सेठी यांच्या मते, “किवी नियमित खाल्ल्यानं आतड्यांतील जीवाणूंचं संतुलन राखलं जातं आणि कोलनच्या भीतीचं आरोग्य टिकून राहतं.” त्यामुळे शरीरातील पचन प्रक्रिया मजबूत राहते आणि दीर्घकालीन आजार टाळले जातात.
३. सफरचंद
डॉ. सेठी म्हणतात, “सफरचंद कोलनसाठी एक मजबूत संरक्षक आहे. त्यातील पेक्टिन नावाचं नैसर्गिक फायबर आतड्यांना स्वच्छ करतं आणि कर्करोग निर्माण करणारे घटक बाहेर टाकतं.” सफरचंदातील फ्लॅवोनॉइड्स शरीरातील सूज कमी करतात आणि पेशींना पुनर्जीवित ठेवतात. दररोज एक सफरचंद खाल्लं, तर आतड्यांचं आरोग्य वर्षानुवर्षं टिकून राहू शकतं.
४. टरबूज
उन्हाळ्यात सर्वांना प्रिय असलेलं टरबूज फक्त तहानच भागवत नाही, तर ते लायकोपीन या प्रभावी अँटिऑक्सिडंटचं जबरदस्त स्रोत आहे. हा घटक शरीरातील दाह कमी करतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतो. डॉ. सेठी सांगतात, “अलीकडील एका मोठ्या संशोधनात टरबूज खाणाऱ्यांना मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक कमी असल्याचे आढळले. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील लायकोपीन.” म्हणून टरबूज म्हणजे फक्त थंडावा नाही, तर आतड्यांसाठी एक ‘रोगविरोधी ढाल’ आहे.
शेवटी डॉक्टरांचा सल्ला
डॉ. सेठी यांनी, मोठ्या आतड्याचा कर्करोग टाळण्यासाठी महागडी औषधं नव्हे, तर रोजचं अन्न आणि जीवनशैलीच महत्त्वाची आहे. रंगीबेरंगी फळं, नियमित व्यायाम आणि कमी प्रक्रिया केलेलं अन्न हेच दीर्घायुष्याचं रहस्य आहे.” असे निक्षून बजावले आहे.
थोडक्यात :
जर तुम्हाला पोट, आतडी आणि पचनसंस्थेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर तुमच्या आहारात या चार फळांचा समावेश आजपासूनच करा. कारण- या फळांमध्ये लपलेलं आहे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कर्करोगविरोधी शक्तीची नैसर्गिक संरक्षण कवच!