चपाती, भाकरी, रोटी किंवा पराठा हा प्रत्येक जेवणाचा एक सामान्य भाग आहे. डाळी, भात आणि भाज्यांमध्ये विविधता असली तरी, बहुतेक लोकांच्या ताटात चपाती नेहमीच असते. अनेक लोक गव्हाची चपाती खातात. गव्हामध्ये ग्लुटेन असते, जे सामान्य लोकांसाठी सुरक्षित असते. मात्र, काही लोक ग्लुटेन असहिष्णुता किंवा संवेदनशील पोट असलेले लोक खाताना अस्वस्थता अनुभवू शकतात. रिफाइंड गव्हाच्या पीठापासून बनवलेली चपाती मधुमेह आणि हृदयरोग असलेल्यांसाठी हानिकारक असू शकते. या उच्च कॅलरी पीठापासून बनवलेल्या चपात्या दोनपेक्षा जास्त खाल्ल्यास लठ्ठपणा होऊ शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, जर तुम्हाला तुमची भाकरी किंवा चपाती अधिक पौष्टिक, निरोगी, मधुमेह आणि हृदयासाठी अनुकूल बनवायची असेल, तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या भाकरीऐवजी बेसनाची निवड करा. बेसनाचे पीठ अत्यंत पौष्टिक असते. बेसनाचा वापर रोटी, पराठे, कढी, डाळ, पक्वान आणि इतर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. हे पीठ जितके चविष्ट आहे तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ते शरीर निरोगी राखतात. तेव्हा जाणून घ्या बेसन आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे आणि ते मधुमेह नियंत्रित कसे करते तसंच यापासून बनवलेल्या रोट्या खाण्याचे फायदे काय?

बेसन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते

संशोधनातून असे समोर आले की, बेसनातील विरघळणारे फायबर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ते हृदयाच्या आरोग्यासही मदत करते. बेसनातील प्रथिने आणि फायबर केवळ पचनासाठी फायदेशीर नाहीत, तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासही मदत करतात. बेसनातील विरघळणारे फायबर रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल राखण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि धोका टाळता येऊ शकतो.

बेसनमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे आवश्यक खनिजे असतात. ती हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तीन चमचे बेसनामध्ये केळ्याइतके पोटॅशियम असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. या पीठापासून बनवलेल्या रोटी किंवा पराठे खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहील.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

हेल्थलाइनच्या माहितीप्रमाणे, मधुमेह रूग्णांसाठी बेसन खाणे फायदेशीर आहे. त्यात फायबर आणि प्रथिने जास्त असल्याने कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. संशोधनानुसार, जेवणासोबत किंवा नंतर बेसन किंवा काळ्या चण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर सुमारे ३६ टक्के कमी होऊ शकते.

बेसनाचे फायदे

बेसनमध्ये ग्लुटेन नसते. त्यामुळे ते ग्लुटेन संवेदनशील व्यक्तींसाठी देखील सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. बेसनामुळे पचन सुधारते. कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे संतुलित मिश्रण दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदन करते. त्यात उच्च फायबर सामग्री पचनसंस्था मजबूत करते आणि चयापचय सुधारते. फायबरयुक्त बेसन दीर्घकाळ भूक भागवते, अति खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. बेसन केवळ खाण्यासाठीच नाही, तर त्वचेची काळजी घेण्यासाठीही उपयुक्त आहे.

बेसन आणि गुलाबपाण्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ, चमकदार आणि मुरूमांपासून मुक्त होते. बेसनमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि ते पचण्यास सोपे असतात. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. बेसनाचे नियमित सेवन केल्याने शरीराला आवश्यक खनिजे आणि प्रथिने मिळतात. त्यामुळे ह्रदय मजबूत होते आणि रक्ताभिसरण सुधारते.