समीर नेर्लेकर – response.lokprabha@expressindia.com

अ‍ॅनिमेशन या दृक् श्राव्य कलेद्वारे एक अनोखं आभासी जग निर्माण करता येतं आणि त्या विस्मयकारी जगाची सफर प्रेक्षकांना घडवून आणता येते. आज अनेक क्षेत्रांत अ‍ॅनिमेशनचा वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे इथे काम करायला भरपूर वाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मनोरंजनाच्या क्षेत्रात अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स हे अगदी महत्त्वाचे शब्द बनले आहेत; परंतु अ‍ॅनिमेशन हे कार्यक्षेत्र केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. माहिती – तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातही अ‍ॅनिमेशनचा फार मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. खिशातला स्मार्टफोन काढून बघितल्यास त्यातील विविध अ‍ॅप्समध्ये अ‍ॅनिमेशन बघायला मिळते. त्याचबरोबर इंटरनेटवरील विविध वेबसाइट्स, ई – लर्निग अ‍ॅप्लिकेशन्स, टीव्हीवरील जाहिराती, व्हिडीओ गेम्स, आर्किटेक्चरल वॉक – थ्रू अशा अनेक ठिकाणी अ‍ॅनिमेशनचा वापर होतो.

कलेचे क्षेत्र हे प्रामुख्याने तीन भागांत विभागले जाते. पहिले – फाईन आर्ट्स, दुसरे – इंडस्ट्रिअल डिझाइन आणि तिसरे – कम्युनिकेशन डिझाइन. अ‍ॅनिमेशनची गणना तिसऱ्या प्रकारात म्हणजेच कम्युनिकेशन डिझाइन या विभागात होते. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे कम्युनिकेशन स्किल उत्तम असणे आवश्यक आहे. कला आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ असलेले हे क्षेत्र आहे. म्हणून अ‍ॅनिमेशनचे अनेक अभ्यासक्रम हे विज्ञान शाखेच्या अंतर्गत राबविले जातात.

अ‍ॅनिमेशन हा शब्द ‘अ‍ॅनिमा’ या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ आहे ‘प्राण’ किंवा ‘आत्मा.’ एखाद्या निर्जीव वस्तूत प्राण ओतणे हा अर्थ त्यातून अभिप्रेत आहे. निर्जीव चित्रांमध्ये हालचालींचा आभास निर्माण करून त्या चित्रांना जिवंत करण्याचेच हे कौशल्य आहे. आज भारतासह अनेक देशांमध्ये अ‍ॅनिमेशन ही कला इंडस्ट्रीच्या स्वरूपात विकसित होत आहे. जागतिक स्तरावर पिक्सार, वॉल्ट डिस्ने स्टुडिओ, ड्रीम वर्क अ‍ॅनिमेशन, फ्रेम स्टोअर, काटून नेटवर्क, निकेलोडियन, वॉर्नर ब्रदर्स, मूव्हिंग पिक्चर कंपनी, सोनी पिक्चर्स, रिदम अ‍ॅण्ड ह्य़ूज, नाइन सोनी एंटरटेनमेंट, पोगो अशा अनेक कंपन्या मोठय़ा प्रमाणावर अ‍ॅनिमेशन प्रोजेक्ट्सची निर्मिती करू अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय करीत आहेत. भारतात माया एंटरटेनमेंट, पेंटामीडिया ग्राफिक्स, क्रेस्ट अ‍ॅनिमेशन, टून्झ अ‍ॅनिमेशन, यूटीव्ही टून्झ, पद्मालया टेलिफिल्म्स, अ‍ॅनिब्रेन, रिलायन्स मीडिया वर्क्‍स अशा कंपन्या जागतिक दर्जाचे कार्य करीत आहेत.

अ‍ॅनिमेशनचे अनेक प्रकार आहेत, पण मुख्य दोन प्रकारे म्हणजे ट्रॅडिशनल अ‍ॅनिमेशन (पारंपरिक) आणि सी. जी. अ‍ॅनिमेशन (कॉम्प्युटर जनरेटेड). पारंपरिक अ‍ॅनिमेशनमध्ये एका सेकंदाला २४ चित्रे या दराने हजारो चित्रे हाताने रेखाटली जातात आणि नंतर त्याचे फ्रेम बाय फ्रेम चित्रीकरण केले जाते. हे काम अत्यंत जिकिरीचे आणि चिकाटीचे आहे. आजदेखील काही खास प्रोजेक्ट्समध्ये पारंपरिक अ‍ॅनिमेशनचा आवर्जून वापर केला जातो. कॉम्प्युटर जनरेटेड अ‍ॅनिमेशनमध्ये टूडी अ‍ॅनिमेशन आणि थ्रीडी अ‍ॅनिमेशन असे दोन मुख्य प्रकार आहेत. याशिवाय स्टॉप मोशन, क्ले – मेशन, पपेट अ‍ॅनिमेशन, कटआऊट अ‍ॅनिमेशन, रोटोस्कोपी असे अनेक प्रकार आहेत. अलीकडच्या काळातील सर्वच चित्रपट – मालिकांमधील स्टंट दृश्ये, स्पेशल इफेक्ट्स यासाठी अ‍ॅनिमेशनचा वापर केला जातो.

अ‍ॅनिमेशन म्हणजे फक्त कार्टून असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात मात्र आज अनेक क्षेत्रांत अ‍ॅनिमेशनचा वापर केला जात आहे. बांधकाम व्यवसायात एखादा गृहप्रकल्प प्रत्यक्ष बांधून पूर्ण होण्यापूर्वी कसा दिसेल याची कल्पना येण्यासाठी अ‍ॅनिमेशन वापर करून त्या प्रकल्पाचा थ्रीडी वॉक – थ्रू तयार केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात शरीराच्या अंतर्गत सूक्ष्म कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅनिमेशनचा आधार घेतला जातो. अंतराळ विज्ञान क्षेत्रात एखादी अंतराळ मोहीम प्रत्यक्षात साकार करण्याअगोदर त्या मोहिमेचे अ‍ॅनिमेशन केले जाते आणि त्याचा सखोल अभ्यास करून मगच त्या मोहिमेला मान्यता दिली जाते. औद्योगिक क्षेत्रात मशीन डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, रोबोटिक सायन्स, ऑटोमोबाइल, वेब टेक्नॉलॉजी, गेमिंग इंडस्ट्री अशा अनेक क्षेत्रांत अ‍ॅनिमेशनचा वापर केला जातो.

अ‍ॅनिमेशनची संपूर्ण प्रक्रिया ही तीन भागांत विभागलेली असते. प्री प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन. सुरुवातीच्या टप्प्यात कन्सेप्ट आणि स्क्रिप्ट रायटिंग यावर काम केले जाते. त्यानंतर स्टोरी बोर्ड तयार केला जातो. स्टोरी बोर्ड म्हणजे अ‍ॅनिमेशन प्रोजेक्टमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची कच्ची रेखाटने. हे काम सर्वात महत्त्वाचे असते. या कामात कलावंताच्या कल्पनाशक्तीचा कस लागतो. अ‍ॅनिमेशन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना ग्राफिक डिझाइनिंगचे ज्ञान असणे आवश्यक असते. रंगसंगती, मांडणी या गोष्टी ग्राफिक डिझाइनिंगप्रमाणे अ‍ॅनिमेशनमध्येही महत्त्वाच्या आहेत. आजच्या काळात अ‍ॅनिमेशनसाठी लागणारी चित्रे रेखाटण्यासाठी आणि थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. कॉम्प्युटरच्या मदतीमुळे मानवी श्रम कमी झाले आणि अ‍ॅनिमेशनचे काम अधिक वेगवान झाले. ही सॉफ्टवेअर्स वापरण्याचे कौशल्य अ‍ॅनिमेटरला आत्मसात करून घ्यावे लागते. त्यासाठी अ‍ॅनिमेटर हा केवळ कलाकार असून चालत नाही; तर तो कुशल तंत्रज्ञही असावा लागतो. प्रत्येक अ‍ॅनिमेशन प्रोजेक्टमध्ये अनेकांचा सहभाग असतो. कथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, व्हॉईस आर्टिस्ट, चित्रकार अशा अनेकांना एकत्र काम करावे लागते. बहुआयामी प्रतिभावंत व्यक्ती या सर्व भूमिका एकटय़ाने पार पाडू शकतात.

अ‍ॅनिमेशनचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी भारतात तसेच परदेशात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने बी.एस्सी. अ‍ॅनिमेशन, एम.एस्सी. अ‍ॅनिमेशन, बी. डेस, डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन असे अनेक कोर्सेस दहावी-बारावीनंतर उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी संस्थांद्वारे कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात. अ‍ॅनिमेशनच्या पदवी अभ्यासक्रमात ड्रॉइंग, डिझाइन, इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझाइनिंग, स्क्रिप्ट रायटिंग, टू डी अ‍ॅनिमेशन, थ्री डी अ‍ॅनिमेशन, डिजिटल फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, ऑडियो-व्हिडीयो एडिटिंग, वेब टेक्नॉलॉजी, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, यू. आय. डिझाइन, गेम डिझाइन, व्हीएफक्स हे तीन वर्षांत शिकवले जातात. त्यात प्रोजेक्ट आणि शो-रील यांचाही समावेश असतो.

अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात रोजगाराच्या विपूल संधी उपलब्ध आहेत. अ‍ॅनिमेशनची पदवी अथवा पदविका पूर्ण केल्यानंतर काही वर्षे नोकरी करून पुरेसा अनुभव प्राप्त केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणे शक्य आहे. शैक्षणिक संस्थांचे ई-लर्निग प्रोजेक्ट्स, डॉक्युमेंट्री फिल्म्स, मेडिकल प्रेझेंटेशन्स, कंपनी प्रेझेंटेशन्स अशी मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. तसेच या क्षेत्रात गुणवत्ता, प्रतिभा आणि अनुभवाच्या आधारे उत्तम पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. कन्सेप्ट डेव्हलपर, व्हिज्युअलायझर, स्क्रिप्ट रायटर, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कॅमेरा आर्टस्टि, गेम डिझायनर, वेब डिझाइनर, ग्राफिक डिझाइनर, ऑडियो-व्हिडीओ आर्टिस्ट, रोटो आर्टस्टि, व्हीएफएक्स आर्टिस्ट अशा विविध पदांसाठी अ‍ॅनिमेशन इंडस्ट्रीत नोकऱ्या उपलब्ध आहेत.

अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत. कार्टून बघायला, गेम खेळायला आवडते म्हणून अ‍ॅनिमेशनकडे कल आहे असा निष्कर्ष काढण्याची चूक पालकांनी मुळीच करू नये. मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला प्रवेश मिळत नाही म्हणून अ‍ॅनिमेशनचे करिअर निवडणे हीदेखील मोठी चूक ठरू शकते. मुलांची इच्छा नसताना त्यांच्यावर अ‍ॅनिमेशनचे करिअर लादणे हेदेखील योग्य नाही. अ‍ॅनिमेशन हे ‘कौशल्य आधारित’ म्हणजेच ‘स्किल बेस्ड करिअर’ आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता, नव्या संकल्पना, कलेची आवड आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानावर प्रभुत्व हे गुण अंगी असतील तरच या क्षेत्रात निभाव लागू शकतो. या कामात प्रचंड चिकाटीची आवश्यकता असते. सलग अनेक तास एका जागी बसून काम करावे लागते. जोपर्यंत काम मनासारखे होत नाही, तोपर्यंत त्याची पुनरावृत्ती करावी लागते. या सगळ्याचा विचार करूनच अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील करिअरचा विचार करावा.

अफाट कल्पनाशक्ती, इतरांपेक्षा वेगळे काही तरी करून दाखवण्याची जिद्द, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी अ‍ॅनिमेशन क्षेत्राची दालने खुली आहेत.
सौजन्य – लोकप्रभा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animation combination of art and technology lokprabha career special issue