Bathroom Mirror Cleaning Tips : हल्ली सर्वांच्याच बाथरुममध्ये आरसा असतो. बाथरुममधील आरश्याचे अनेक फायदे आहेत. अनेकदा फेसपॅक लावण्यासाठी तसेच अंघोळीनंतर चेहरा स्वच्छ झाला की नाही हे पाहण्यासाठी, तर पुरुषांना शेविंग करण्यासाठी या आरश्याचा वापर होतो. पण, हा आरसा अनेकदा ओलावा आणि वाफेमुळे धुरकट होतो, ज्यामुळे त्यात चेहरा स्पष्ट दिसत नाही; त्यामुळे आरसा वेळोवेळी स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.

बहुतेकदा लोक बाथरुममधील आरसा कापडाने पुसतात किंवा त्यावर बाजारात उपलब्ध असलेल्या क्लिनिंग स्प्रेचा वापर करतात, पण तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून बाथरुममधील आरशाचा हरवलेला चमकदारपणा परत आणू शकता. यासाठी तुम्ही खालील सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता.

बाथरुममधील धुरकट चिकट आरसा स्वच्छ करण्यासाठी टिप्स

१) कांदा-लसूण

स्वयंपाकघरातील कांदा आणि लसूण वापरूनही तुम्ही बाथरुममधील आरसा स्वच्छ करू शकता. कांदा आणि लसणाचा रस आरशाची चमक वाढवण्याचे काम करेल. हा उपाय अनेकांसाठी नवीन असू शकतो, परंतु तो खूप प्रभावी ठरू शकतो.

कसा वापर करायचा?

१) प्रथम एक कांदा किंवा लसणाची एक मोठी पाकळी घेऊन ती मधून अर्धी चिरा.

२) आता कांदा किंवा लसणचा अर्धा तुकडा थेट धुरकट आरश्यावर हलक्या हाताने घासून घ्या. जास्त दाब देऊ नका, फक्त रस काचेच्या पृष्ठभागावर लागेल असा दाब द्या.

३) आता आरशावर रस काही मिनिटे राहू द्या. कांदा किंवा लसणामधील काही संयुगे आरशावरील धुरकटपणा कमी करण्यास मदत करू शकतात.

४) यानंतर स्वच्छ आणि कोरड्या कापडाने आरसा पूर्णपणे पुसून टाका. तुम्हाला दिसेल की, आरशावरील धुरकटपणा नाहीसा झाला आहे आणि आरसा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार दिसत आहे.

२) लिंबाचा असा करा वापर

एक ताजे लिंबू घ्या आणि ते अर्धे कापा. कापलेल्या लिंबाचा तुकडा थेट धुरकट आणि डागाळलेल्या आरश्यावर हळूवारपणे घासा. ज्या ठिकाणी जास्त डाग आहेत, त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस काढून तो बाटलीत भरून स्प्रेदेखील करू शकता. लिंबाचा रस काचेवर सुमारे ५ ते १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर तो स्वच्छ आणि मऊ कापडाने पुसून टाका, यामुळे डाग निघून जातील आणि तुमची काच नव्यासारखी चमकताना दिसेल.