7 Reasons to include pumpkin seeds in your diet : निसर्गाने आपल्याला विविध प्रकारची फळे, भाज्या, बिया दिल्या आहेत; ज्या आपल्या शरीराला आवश्यक पोषण तत्वे प्रदान करतात. भोपळ्याच्या बिया यापैकीच एक आहेत आणि त्यांचा आकार लहान असूनही, त्यांना उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत मानले जाते. दररोज फक्त एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीराला मॅग्नेशियम, जस्त, लोह, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मिळतात. म्हणूनच त्यांना उर्जेचे पॉवरहाऊस आणि वनस्पती-आधारित प्रथिनांचे एक उत्कृष्ट स्रोत देखील आहेत.
पण, तुम्हाला माहिती आहे का? की, या लहान भोपळ्याच्या बिया तुमच्या संपूर्ण शरीराला नैसर्गिकरित्या बरे करू शकतात. दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तुमच्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या जवळजवळ अर्ध्या गरजा पूर्ण होतात. त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि अनेक जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरात ३०० पेक्षा जास्त एंजाइमॅटिक आधारित क्रिया करण्यास मदत करतात. जसे की, शरीराला ऊर्जा मिळवायला, स्नायू आणि नसा आणि आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत करतात. आयुर्वेदानुसार, मॅग्नेशियम शरीरातील पाचनशक्ती संतुलित ठेवते; ज्यामुळे अन्न पचवण्याची प्रक्रिया सुधारते. या बिया बदामापेक्षाही जास्त गुणकारी असतात.
भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्या मते, भोपळ्याच्या बियांमधील प्रथिने शरीरातील पेशी आणि ऊतींची दुरुस्ती करतात, निरोगी शरीर राखतात आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात. दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने आरोग्यासाठी कसे फायदे होतात हे एका तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
हृदयाचे आरोग्य – भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. भोपळ्याच्या बियांमधील ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. यामुळे हृदय मजबूत होते आणि रक्तवाहिन्या लवचिक आणि निरोगी राहतात.
पुरुषांसाठी वरदान – भोपळ्याच्या बियांमध्ये आढळणारे झिंक पुरुषांसाठी खूप फायदेशीर असते; जे प्रोस्टेटचे आरोग्य सुधारते आणि पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवते. तसेच प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढण्याची समस्या कमी करते. प्रोस्टेट म्हणजे पुरुषांच्या शरीरातील एक लहान ग्रंथी ती मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रनलिकेभोवती असते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते- भोपळ्याच्या बियांमधील झिंक, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे संक्रमण आणि आजारांपासून लढण्यास मदत करतात. दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते – भोपळ्याच्या बियांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यात मॅग्नेशियम भरपूर असते; यामुळे इन्सुलिन नियंत्रित राहते; त्यामुळे मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असलेल्या लोकांसाठी खूप फायदा होतो. मधुमेहींना दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
झोप सुधारते – रात्री भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने झोप सुधारते आणि निद्रानाश कमी होतो. त्यात असलेले अमिनो आम्ल ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत होते; जे झोपेचे नियमन करतात.
मानसिक आरोग्य सुधारते – भोपळ्याच्या बियांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम मेंदूचे कार्य वाढवते. ते मूड सुधारतात, नैराश्य कमी करतात आणि स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवतात. जर तुम्हाला ताण येत असेल किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाण्याचा विचार करा.
