डॉ.अमोल देशमुख

बायपोलार डिसऑर्डर किंवा द्विध्रुवीय आजार किंवा दोन टोकांचा आजार हा एक तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे. हा आजार १८ ते ३० वर्षे या वयोगटात होण्याची शक्यता जास्त असते. हा आजार स्त्री आणि पुरुषांना समप्रमाणात होतो. जगभरात ४५ दशलक्ष लोकांना हा आजार आहे.

बायपोलार डिसऑर्डर या आजारात दोन अवस्था असतात. एका टोकाला नैराश्य तर दुसऱ्या टोकाला अतिउत्साह किंवा उन्माद असतो. म्हणजेच व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक चढ-उतार येतात. उदासीनतेच्या अवस्थेमध्ये प्रामुख्याने सतत उदास वाटते, पूर्वी ज्या गोष्टी करण्यात रस आनंद वाटायचा तसे आता वाटत नाही, विनाकारण थकवा जाणवतो, भूक, झोप व वजन अचानक कमी किंवा जास्त होणे, शारीरिक हालचाली मंदावणे, मनात वाईट विचार येणे, आत्मविश्वास कमी होणे, सतत आत्महत्येचे विचार येणे अथवा तसा प्रयत्न केला जाणे. अशा प्रकारची किमान चार लक्षणे, सतत १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी आढळल्यास आपल्याला उदासीनतेचा आजार म्हणता येईल.

अतिउत्साहाची अवस्था (मॅनिया) उदासीनतेच्या उलट आहे, यात अतिउत्साह असतो. ज्यामध्ये व्यक्ती विनाकारण जास्त आनंदी राहतो, अचानक अतिजास्त आध्यात्मिक होणे, अवास्तव बढाया मारणे, अवास्तव ध्येय बाळगून त्या अनुषंगाने सतत क्रियाशील होणे, झोपेची गरज कमी होणे, कोणताही विचार न करता मोठे निर्णय घेतो. त्याचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. विविध विषयांवर एकसारखी बडबड करणे, प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च करणे (उदा. जेवण, कपडे, दानधर्म) आणि त्यामुळे अडचणीत येणे, कधी कधी तीव्र आक्रमक होणे अशा प्रकारची किमान तीन लक्षणे, सतत सात दिवसांसाठी आढळून येऊन व्यक्तीचे सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक नुकसान होत असल्यास आपण त्याला मॅनिया किंवा उन्माद म्हणू शकतो.

हा आजार होण्यामागे विविध कारणे असू शकतात. जैविक मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटक या आजारासाठी कारणीभूत असू शकतात. जैविक कारणांमध्ये जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार असेल तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना हा आजार होण्याची शक्यता असू शकते. मेंदूतील विशिष्ट भागात होणारे रासायनिक बदल हा आजार होण्यामागे कारणीभूत असतात. मानसशास्त्रीय कारणांमध्ये कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, बेरोजगारी, एखादे गंभीर स्वरूपाचे आजारपण यांमुळे मानसिक ताण वाढून हा आजार उद्भवू शकतो. व्यसनाधीन व्यक्ती (उदा. दारू, गांजा, भांग, ब्राऊन शुगर इत्यादी) या आजाराला बळी पडण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.

या आजाराचे योग्यवेळी निदान आणि उपचार या आजारात होणे महत्त्वाचे ठरते. सातत्यपूर्ण उपचार याची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात. मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार घेतल्यास रुग्ण व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकते. औषधांच्या मदतीने मेंदूतील रसायनांचं (डोपामाइन) प्रमाण संतुलित राखलं जातं. काही तीव्र अवस्थांमध्ये रुग्णांना विद्युतउपचार पद्धती परिणामकारक ठरते. समुपदेशन म्हणजेच सायकोथेरपी आजाराच्या विशिष्ट टप्प्यात प्रभावी ठरते. यासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव नियमन पद्धती, आपापसात सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. व्यक्तीला आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जागरूक करणे गरजेचे असते, यामुळे आजाराने होणारी हानी टाळणे शक्य होते.