– स्वप्नील जोशी

हॅशटॅग….! आजकाल सोशल मीडियावर असाल तर ह्याबद्दल माहित नसेल असं क्वचितच होईल. हल्ली कशालाही हॅशटॅग केलं जात. असं केल्याने आपण पुरोगामी पोस्टकर्ते आहोत आणि चिरतरुण आहोत असं काहीना वाटतं अशी आपली एक धारणा आहे. परंतु काय हॅशटॅग करावं ह्यालाही काही नियम आहेत, किंबहुना जो हेतू हॅशटॅग मधून साध्य करायचा असतो तो असे नियम न पाळल्यामुळे साध्य होत नाही. नुसतं आधुनिक पद्धत म्हणून काहीही हॅशटॅग म्हणजे प्रसंगी संपूर्ण वाक्यच्या वाक्य हॅशटॅग करणे चुकीचे ठरते. तर बघूया हॅशटॅग बद्दल!!

हॅशटॅग चा इतिहास आणि उपयोग

सोशल मीडिया संदर्भात हॅशटॅग हा प्रथम ट्विटरवर अस्तित्वात आला. २३ ऑगस्ट २००७ साली १२ वाजून २५ मिनिटांनी प्रसिद्ध सोशल टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट क्रिस मसिनाने “how do you feel about using # (pound) for groups. As in #barcamp [msg]?” असं ट्विट केलं आणि तिथूनच सोशल मीडियावर हॅशटॅग आणि ट्रेंडिंग ची सुरुवात झाली. थोडंसं तांत्रिक बोलायचं झालं तर ह्या हॅश चिन्हाचा म्हणजे “#” चा उपयोग तंत्रज्ञानाच्या जगातला १९७८ मध्ये “सी प्रोग्रामिंग” ह्या संगणक प्रोग्रामिंग च्या भाषेपासून ज्ञात आहे. ह्या भाषेचे निर्माते डेनिस रिची ह्यांनी “#” सिम्बॉल चा उपयोग सी ह्या भाषेत केला होता जो आजही केला जातोच ह्याशिवाय इतरही अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये “#” चे वेगवेगळे उपयोग आहेत. सोशल मीडिया वर आज हॅशटॅग शिवाय पान हलत नाही. विविध मार्केटकींग एजन्सीज, कंपनी पेजेस, किंवा सामान्य वापरकर्ते हे सगळे हॅशटॅग वापरात असतात.

हॅशटॅग संबंधी प्राथमिक नियम आणि योग्य हॅशटॅग

हॅशटॅग तयार करण्याचा एक साधा नियम आहे. कमीत कमी शब्द, शक्यतो एकच शब्द वापरावा. कारण ट्विटर किंवा इन्स्ताग्रामवर शब्दमर्यादा असतात. फेसबुकसारखं तुम्ही त्यावर लांबलचक स्टेटस टाकू शकत नाही. जर एकापेक्षा अधिक शब्द असतील तर या शब्दांमध्ये स्पेस अजिबात सोडायची नाही. सलग शब्द टाईप करायचे. # आणि पुढे तुमचे शब्द. यात कुठेही स्पेस पडता कामा नये. समजा तुम्ही सोशलमीडियावर Social Media असं स्टेटस टाकलं तर या दोन शब्दांच्या मध्ये तुम्ही स्पेस देऊन तो टाकता. पण हॅशटॅग तयार करताना असं लिहून चालत नाही ते #Social Media किंवा #Social_Media असंच लिहावं लागतं. अंडरस्कोर (_) स्पेशल कॅरॅक्टर हॅशटॅग मध्ये चालते बाकी कोणतेही सिम्बॉल हॅशटॅग बिघडवतात. दहावी बारावीमध्ये असतांना किंवा अगदी पदवी परीक्षेत पेपर मध्ये महत्वाचे शब्द उत्तरात अधोरेखित करायचे असं सांगितलं जात जेणेकरून त्याकडे परीक्षकाचं पटकन लक्ष जातं. आपल्या सोशल मीडियाच्या भाषेत ह्यालाच आपण हॅशटॅग मुळे एखादी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आली म्हणतो आणि ते अधोरेखित म्हणजेच हॅशटॅग असा तर्क लावता येईल आत्ताच ताज उदाहरण म्हणजे डिलीट फेसबुक हा सुद्धा एक हॅशटॅग होता. जो खूप ट्रेंड म्हणजे प्रसिद्ध झाला आणि सोशल साईट्स वर गाजला (आम्ही पेपरात, महत्वाचं सोडून सगळं लिहिल्याने अधोरेखित वगैरे करायची वेळच आली नाही असो!)

हॅशटॅगचा उपयोग

हॅशटॅगमुळे एक लिंक निर्माण होतो. ही लिंक आपल्याला हॅशटॅगमध्ये नमूद केलेल्या विषयाशी संबंधित इतरांनी केलेल्या पोस्ट एकत्रितपणे एका वेगळ्या पानावर किंवा त्याच ठिकाणी एकत्र दाखवतो गंमत म्हणून एखाद्या हॅशटॅगवर क्लिक करून बघा. अशाने माहितीची वेगवेगळ्या विषयानुसार वर्गवारी होते.आणि असा एकच विशिष्ट हॅशटॅग जगभरातून सोशल मीडियावर पोस्ट होत राहिला तर तो ट्रेंडिंग मध्ये आहे असं म्हंटल जात. फेसबुक सारख्या अप्लिकेशन मध्ये उजव्या बाजूला ट्रेण्डिंग्स दिसत असतात. क्रिस मसिनाने सोशल मीडिया वर हॅशटॅग ह्यासाठीच आणला होता की सामान्य वापरकर्त्याला कमी कष्टात विशिष्ट माहिती एका हॅशटॅग लिंक वरून उपलब्ध होईल. अनेक मोठमोठ्या कंपनीज हॅशटॅग वापरून आपली नवीन उत्पादने, एखादी ऑफर, किंवा नवीन सेवा पोस्ट करत असतात. सोशल मीडिया वरील पोल्स किंवा प्रश्नोत्तरे ह्यात हॅशटॅग वापरले जातात(म्हणजे हा त्याचा मूळ उद्देश आहे) ज्यामुळे ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळेल आणि वाचणाऱ्याला त्याचप्रमाणे कंपनीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याने फायदा होईल. मी सुद्धा पोस्ट मध्ये #INविस्तृत असं हॅशटॅग करतो, तुम्ही त्यावर क्लिक केलं तर सगळ्या पोस्ट एका खाली एक फेसबुक किंवा जिथे हा हॅशटॅग दिसेल तिथे पाहायला मिळतील.

हॅशटॅग चा अतिरेक आणि बॅशटॅग

हॅशटॅगमुळे फजिती (की पोपट) झाल्याची सुद्धा उदाहरणं पाहायला मिळतात ह्यालाच बॅशटॅग म्हणतात. मॅक डोनाल्डस ने #McDStories अशा हॅशटॅग मार्फत आपले अनुभव मांडायची विनंती ग्राहकांना केल्यावर अनेक ग्राहकांनी त्यावर विचित्र पोस्ट टाकल्याने ह्या हॅशटॅग ने कंपनीला पश्चाताप झाल्याची शक्यता जास्त. दुसरे उदाहरण जेपी मॉर्गन ह्या प्रसिद्ध कंपनीच्या #AskJPM ह्या हॅशटॅग संबंधी अशाच स्वरूपात देता येईल, तिथेही ग्राहकांनी किंवा ट्विटरकरांनी त्याची फजितीच उडवली होती.
सोशल मीडियावर ह्या हॅशटॅग चा सध्या अतिरेक पाहायला मिळतो अगदी व्हॉट्सऍप सारख्या पर्सनल मेसेजिंग अप्लिकेशन वर सुद्धा लोक हॅशटॅग टाकतात, ज्याने काहीही साध्य होत नाही कारण मेसिजिंग अप्लिकेशन असल्याने कोणतीच लिंक तिथे तयार होत नाही. दुसरं म्हणजे #नुसताधूर #जाळ #जीवनसुंदरआहे अशा प्रकारचे हॅशटॅग फेसबुक वर कमेंट्स करण्यासाठी वापरले गेलेत हे अत्यंत रिकामटेकडे ठरलेले आहेत, ह्या नावाचे पब्लिक प्लॅटफॉर्म वगैरे बनवले तर त्याचा सकारात्मक उपयोग. #अमुकतमुकलावाढदिवसाच्याशुभेच्छा हेही एका विचित्र हॅशटॅग चे उदाहरण. फक्त नावीन्य फॉलो करायचं म्हणून एका व्यक्ती सापेक्ष वाक्याला हॅशटॅग करण्यात काहीच अर्थ नाही कारण हॅशटॅग चा मूळ उद्देश त्यात साध्यच होत नाही. तेव्हा जाता जाता एवढंच की हॅशटॅग करतांना एखादा विशिष्ट शब्द जो त्या पोस्ट मध्ये महत्वाचा आहे. किंवा डिलीट फेसबुक सारखं एखादं आवाहनात्मक काही असेल तर किंवा एखादी सामाजिक शुभेच्छा, नववर्षाचे स्वागत त्या अनुषंगाने तुमच्याकडे एखादं उत्पादन किंवा नवीन काही सुरु करीत असाल तर त्याचे नाव, विशिष्ट मानवी भावना, समाजिक किंवा राजकीय परिस्थिती चे एका शब्दात विश्लेषण, एखादे प्रसिद्ध किंवा नाविन्यपूर्ण ठिकाण ह्या सगळ्याचे हॅशटॅग व्हावेत. #सुप्रभात #आयुष्यसुंदर ह्या हॅशटॅग ने काहीच फायदा नाही उगीच लिंकालिंक. लेखनसीमा. पुन्हा भेटूच नवीन पोस्टसह

फिर मिलेंगे!!

(लेखक व्यवसायानं वेब डेव्हलपर आहेत)