Brain Stroke Symptoms: स्ट्रोक हे एक असं आजारपण आहे जे हृदयाच्या आजारांनंतर जगभरात मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक स्ट्रोक संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे १.२ कोटी लोक स्ट्रोकने आजारी पडतात आणि ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी ८९ टक्के प्रकरणे विकसनशील देशांमध्ये, विशेषतः भारत आणि दक्षिण आशियात आढळतात.
ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था आहे. यात मेंदूच्या एखाद्या भागात रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा खूप कमी होतो. त्यामुळे त्या भागातील पेशींना (ब्रेन सेल्स) पुरेसं ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही, आणि त्या काही मिनिटांत मरायला लागतात. ह्यालाच स्ट्रोक म्हणतात.
ब्रेन स्ट्रोक होण्याची मुख्य कारणं म्हणजे – उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), मधुमेह (डायबिटीज), जास्त कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, जास्त मद्यपान, स्थूलपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव. यामुळे हृदय आणि रक्तप्रवाहावर वाईट परिणाम होतो. ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली (लाइफस्टाइल) हीसुद्धा स्ट्रोकची कारणं ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, स्ट्रोकची लक्षणं लवकर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेला मंत्र ‘बी फास्ट’ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रोक ही “गोल्डन अवर”चं आजारपण आहे. जर लक्षणं दिसल्यानंतरच्या पहिल्या ६० मिनिटांत उपचार मिळाले, तर मेंदूला होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. पण दुर्दैवाने, भारतात बहुतांश रुग्ण रुग्णालयात पोहोचेतोपर्यंत हा “गोल्डन अवर” संपलेला असतो.
स्ट्रोकची लक्षणं (Brain Stroke Early Signs)
- अचानक बोलण्यात किंवा समजण्यात अडचण येणे
- चेहरा किंवा शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवणे
- चक्कर येणे किंवा तोल जाणे
- तीव्र डोकेदुखी होणे
- एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धूसर दिसणे
ब्रेन स्ट्रोकचे प्रकार
इस्केमिक स्ट्रोक (Ischemic Stroke) – हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो सुमारे ८०% प्रकरणांमध्ये आढळतो. यात मेंदूतील रक्तवाहिनी (blood vessel) रक्ताच्या गाठीमुळे (blood clot) किंवा ब्लॉकेजमुळे बंद होते.
हेमरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic Stroke) — हा तेव्हा होतो जेव्हा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटते, ज्यामुळे मेंदूत रक्तस्राव (bleeding) होतो.
ब्रेन स्ट्रोक कसा टाळायचा
उच्च रक्तदाब (हाय बीपी) हा स्ट्रोकचं सर्वात मोठं कारण आहे, त्यामुळे रक्तदाबाची नियमित तपासणी जरूर करा.
तंदुरुस्त आहार घ्या- आहारात ताजे फळं, भाज्या आणि कमी तेलाचं अन्न खा.
धूम्रपान आणि दारूचं सेवन टाळा – हे मेंदूच्या रक्तवाहिन्या कमजोर करतात.
दररोज किमान ३० मिनिटं चालणे, योग किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे.
साखर (शुगर) आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा – हे रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट) होण्यापासून वाचवतात.
ताण कमी ठेवा – ताण नियंत्रणासाठी ध्यान (मेडिटेशन) करा आणि पुरेशी झोप घ्या.
नियमित आरोग्य तपासणी करा – बीपी, शुगर आणि हृदयाची तपासणी दरवर्षी एकदा जरूर करून घ्या.
