प्रत्येक घरामध्ये दालचिनीचा मसाल्यातील पदार्थांमध्ये हमखास समावेश असतोच. भारतीय पद्धतीने जेवण बनवताना याचा सर्रास वापर केला जातो. बिर्याणी, कडी, पुलाव अशा पदार्थांची चव दालचिनीमुळे आणखी वाढते. जेवण बनवताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या या मसाल्याचा त्वचेसाठी देखील फायदा होतो, हे अनेकांना माहित नसेल. दालचिनीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आढळते. पिंपल्स, रिंकल्स अशा चेहऱ्याच्या समस्येवर दालचिनी खाणे फायदेशीर ठरते. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी घरगुती उपचार म्हणून वापरले जाते. दालचिनीचा वापर कसा करावा आणि त्वचेसाठी हे कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.
पिंपल्स
पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. यात आढळणाऱ्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे ॲकने आणि पिंपल्सपासूम सुटका मिळवण्यास मदत मिळते. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मध, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि दालचिनी तेलाचे काही थेंब यांचे मिश्रण बनवा. हे मिश्रण १५ ते २० मिनीटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि त्यांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवून टाका.
रिंकल्स
दालचिनीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस चेहऱ्यावरील रिंकल्स पासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. यासाठी दोन चमचे ऑलिव्ह ऑइल एक चमचा दालचिनी पावडर यांचे मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा गरम पाण्याने धुवून टाका.
टॅनिंग
दही, मध आणि दालचिनी पावडर प्रत्येकी एक चमचा मिसळून त्याचा फेसपॅक बनवा. हा फेसपॅक चेहऱ्यावर सुकेपर्यंत असू द्या. त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. याच्या दररोजच्या वापराने टॅनिंगपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
कोरडी त्वचा
दालचिनी कोरड्या त्वचेवरदेखील फायदेशीर ठरते. दालचिनी पावडर, मध आणि मीठ प्रत्येकी एक चमचा घेऊन त्याचे मिश्रण बनवा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्याच्या कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळेल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
