Natural Ways to Cleanse Lungs: हवेतील थंडावा मनाला सुखावतो; पण त्याच वेळी हवेतील ओलावा (moisture) आणि प्रदूषणातील विषारी घटक सक्रिय होतात. त्यामुळे फुप्फुसांवर (lungs) प्रचंड ताण येतो. अनेकांना श्वसनाचा त्रास, खोकला, दम लागणे किंवा सतत थकवा जाणवतो. पण, यावर उपाय आहे तोही पूर्ण नैसर्गिक.
तज्ज्ञांच्या मते, काही घरगुती डिटॉक्स ड्रिंक्स (Detox Drinks) दररोज घेतल्यास फुप्फुसं स्वच्छ होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम कमी होतात. चला जाणून घेऊया अशी पाच प्रभावी पेये जी तुमची फुप्फुसं आतून स्वच्छ ठेवतील आणि श्वास घेणं अधिक सोपं करतील.
१. मुलेठी चहा – खोकला आणि सर्दीवर रामबाण उपाय
मुलेठी (Mulethi) चहा केवळ गळा स्वच्छ ठेवत नाही, तर फुप्फुसांमध्ये साचलेली घाण आणि चिकटपणा साफ करण्यास मदत करतो. नियमितपणे मुलेठीचा चहा घेतल्यास खोकला, सर्दी आणि दम्याची समस्या नियंत्रणात राहते. एवढंच नव्हे, तर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही तो उपयुक्त ठरतो.
२. मध आणि कोमट पाणी – प्रदूषणावरील नैसर्गिक ढाल
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी आणि एक चमचा मध घेतल्याने शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर पडतात. मधातील anti-inflammatory गुणधर्म सूज कमी करतात, तर कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. हे संयोजन फुप्फुसांना प्रदूषणापासून नैसर्गिक संरक्षण देते.
३. सफरचंद, गाजर आणि बीटरूट स्मूदी – फुप्फुसांसाठी सुपर ड्रिंक!
ही रंगीत स्मूदी म्हणजे फुप्फुसांसाठी आरोग्याचा अमृतसमान घोट. व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांनी भरलेले हे तीन घटक फुप्फुसांच्या पेशींचं नुकसान टाळतात, दम्याचा धोका कमी करतात आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतात.
४. लिंबू, आलं व पुदिन्याचा चहा – श्वासात मिळवा ताजेपणा
थंड हवेत हा चहा म्हणजे आरामाची सोबत. लिंबातील व्हिटॅमिन सी, आल्यातील दाहशामक गुणधर्म, व पुदिन्याचा ताजेपणा मिळून हा चहा शरीरातील विषारी घटक दूर करतो. तो फुप्फुसं स्वच्छ करतो आणि गळ्याला आराम देतो. त्याशिवाय पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती अशा दोन्ही बाबी वाढवतो.
५. हळद-आल्याचे पेय – प्रदूषणावरील सर्वांत शक्तिशाली उपाय
हळदीतील कर्क्यूमिन (Curcumin) हा घटक शरीरातील विषारी द्रव्यांशी लढतो. त्यात anti-inflammatory, antioxidant, anti-toxic व anti-cancer गुण असतात. दररोज गरम पाण्यात आलं आणि हळद घालून प्यायल्याने फुप्फुसं स्वच्छ राहतात आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या सूज, खोकल्यावर त्वरित आराम मिळतो.
तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय आणि त्याचा थेट फटका फुप्फुसांना बसतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. रसायनं किंवा औषधांवर अवलंबून न राहता, ही नैसर्गिक पेयं आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. कदाचित याच एका सवयीमुळे तुम्ही श्वास घ्याल नव्या उर्जेने आणि फुप्फुसं राहतील साफ, मजबूत आणि सुरक्षित!