कामाच्या आणि जेवणाच्याही अनियमित वेळा, धावपळीचे दैनंदिन आयुष्य, बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे हा अनेकांच्या दिनक्रमाचाच भाग बनला आहे. आम्लपित्त किंवा हायपर अ‍ॅसिडिटी होऊन छातीत जळजळणं हा सध्याच्या धावपळीच्या जीवनात जवळजवळ प्रत्येकाला होणारा विकार असतो. अ‍ॅसिडिटीमुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटात जळजळ होते. अ‍ॅसिडिटी अशी एक समस्या आहे ज्यामध्ये फार कमी लोक डॉक्टरांकडे जातात. तसेच यावर आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील लोक करतात. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊयात. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होईल.

गार दुधाचे सेवन करावे

जर का तुम्हाला अ‍ॅसिडिटी झाली असेल तर तुम्ही गार दुधाचे सेवन करू शकता. गार दूध प्यायल्यामुळे पोटामध्ये आराम मिळतो. दुधामध्ये कॅल्शिअम असते ज्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटीमुळे विषारी पदार्थ जमा होऊ देत नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला अ‍ॅसिडिटी होईल तेव्हा तुम्ही एक ग्लास गार दुधाचे सेवन करू शकता.

हेही वाचा : ऐंशीव्या वर्षीही हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवायचे आहे? आतापासूनच दैनंदिन जीवनात करा ‘हे’ बदल

आले

आले हा पदार्थ देखील अ‍ॅसिडिटीवर गुणकारी आहे. अँटी इंफ्लेमेंन्ट्री गुणधर्म असलेले आले देखील अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. आले हा पदार्थ पोटाच्या बहुतांश समस्यांपासून आराम देते. आल्याचे सेवन केल्यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस होणे अशा प्रकारच्या पोटाच्या समस्या दूर होतात. आल्याच्या सेवनामुळे अ‍ॅसिडिटीमुळे छातीमध्ये होणारी जळजळ कमी होते. यासाठी आल्याचे लहान लहान तुकडे करून पाण्यात उकळावे. त्यानंतर ते पाणी प्यावे.

नारळ पाणी

जर का तुम्ही घरामध्ये नसाल आणि कामानिमित्त किंवा अन्य कारणानिमित्त घराबाहेर असाल आणि तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा होत असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. नारळ पाणी अ‍ॅसिडिटीवर एक चांगला पर्याय आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. याचे सेवन केल्यामुळे पोटातील जळजळ दूर होते. यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)