स्मार्टफोनवरील एका विशिष्ट गेमिंग अ‍ॅपचा २५ मिनिटे वापर केल्यास नैराश्य, चिंता कमी होते, असा दावा अमेरिकी वैज्ञानिकांनी केला आहे. ‘गेमिफाइंग’ या अ‍ॅपमुळे माणसाचे नैराश्य कमी होते. अटेन्शन बायस मॉडिफिकेशन ट्रेनिंग (एबीएमटी) या आकलनविषयक उपचारपद्धतीवर आधारित हे अ‍ॅप्लिकेशन आहे. या पद्धतीच्या प्रशिक्षणाने उच्च पातळीवरील नैराश्य व ताण कमी होतो. एकूण ७५ जणांवर प्रयोग करून हे अ‍ॅप तयार करतात. यातील दोन पात्रे पडद्यावर दिसतात व ती सहजपणे आपला मार्ग शोधतात. २५ ते ४५ मिनिटे हा गेम खेळल्यानंतर या व्यक्तींमधील ताणाची लक्षणे नष्ट झालेली दिसली. या प्रतिसादकांना हा गेम खेळल्यानंतर एक छोटे भाषण देण्यास सांगितले व त्याचे व्हिडीओचित्रण करण्यात आले. त्यांच्या बोलण्यात नकारात्मक भावना कमी दिसल्या. हा गेम २५ मिनिटे खेळला तरी त्यामुळे ताण, नैराश्य कमी होते, असे हंटर कॉलेजच्या संशोधिका ट्रेमी डेनिस व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या लॉरा ओट्राल यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे नैराश्य दूर करणाऱ्या अ‍ॅपसाठी करण्यात आला ही चांगली बाब आहे. कमी काळ हा गेम खेळूनही नैराश्य दूर होते किंवा नाही यावर संशोधन सुरू आहे. गर्भवती मातांनी महिन्यातून दहा मिनिटे हा गेम खेळला तरी त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. ज्यांना नैराश्य हा रोग जडलेला आहे त्यांना मानसिक आरोग्य सुधारण्यात या गेमचा कितपत फायदा होतो याचे संशोधन अजून करण्यात आलेले नाही. गेमिफाईड एबीएमटी ही एकप्रकारे बोधनाची लस कॉग्निटिव्ह व्हॅक्सीन असून त्यामुळे नैराश्य व ताण यातून आराम मिळतो. मानसिक रोगात पूरक म्हणून या अ‍ॅपचा वापर नैराश्यावर व एखाद्या स्वरुपाच्या अ‍ॅडिक्शनवर होतो. ‘क्लिनिकल सायकॉलॉजिकल सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression prevention app