Lemon Water Side Effects In Marathi : बदलती जीवनशैली आणि बाहेरच्या खाण्याच्या सवयी यांमुळे अनेक आरोग्य समस्या उदभवत आहेत; ज्यामध्ये पचनाशी संबंधित समस्या आता तर अगदी सामान्य झाल्या आहेत. खरं तर, पचन आणि गॅस इत्यादी समस्यांसाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर मानले जाते. कारण- लिंबू पाणी डिटॉक्स पेय असून, वजन कमी करण्यासाठीसुद्धा रामबाण आहे.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बरेच लोक दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते फायदे देऊ शकते. पण, दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्यामुळे तुम्हाला फायदे मिळण्याऐवजी शरीराचे नुकसानसुद्धा होऊ शकते. अन्न तज्ज्ञ (फूड एक्स्पर्ट) श्रुती भाटिया यांनी सकाळी लिंबू पाणी प्ययाल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल सांगितले आहे.
श्रुती भाटिया म्हणाल्या की, लिंबू पाण्यातील जास्त आम्लता पचनाच्या समस्या निर्माण करते, त्यामुळे इनॅमल कमकुवत होऊ शकते आणि काही लोकांमध्ये छातीत जळजळ, पोट फुगणे आदी समस्या जाणवू शकतात. त्याशिवाय तुम्हाला ॲलर्जीदेखील होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लिंबू पाणी पिणे आवडत असेल, तर त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा, जेणेकरून तुमच्या आरोग्यासाठी त्याचे अधिक फायदे मिळतील.
दररोज लिंबू पाणी प्यायल्यास कोणत्या समस्या उद्भवतात?
१. आम्लपित्त आणि पोटफुगी
एनआयएचच्या अभ्यासानुसार, लिंबू नैसर्गिकरीत्या आम्लपित्तयुक्त असते. म्हणून दररोज जेवणापूर्वी त्याचे सेवन केल्याने पोटाच्या आवरणाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे पोटफुगी किंवा पोट जड वाटू शकते. गॅस्ट्र्रिटिस, आम्लपित्त किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या लोकांना या गोष्टीचा जास्त धोका असतो.
२. अपचन आणि पोटदुखी
लिंबू पाणी पचनास मदत करते. पण, काही लोकांवर याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्याची तीव्र आम्लता पोटाचे नैसर्गिक पीएच संतुलन बिघडवू शकते, ज्यामुळे पेटके, मळमळ किंवा अगदी सौम्य अतिसार (अतिसाराची इजाही पोटात उद्भवते आणि काही दिवसांत ती आपोआपच बरी होते) होऊ शकतो.
३. दातांचा इनॅमल
दातांवर एक सुरक्षा कवच असतं, त्याला इनॅमल, असं म्हणतात. आम्लयुक्त पदार्थ व पेयांनी दातांवरचे इनॅमल नाहीसे होते आणि मग दात झिजायला लागतात. डेंटलीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने दात संवेदनशीलता, पिवळेपणा व दात किडूसुद्धा शकतात. दंतवैद्य लिंबू पाणी स्ट्रॉने पिण्याची आणि त्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुण्याची शिफारससुद्धा करतात.
४. छातीत जळजळ
जर तुम्हाला अॅसिड रिफ्लक्स किंवा हायपर अॅसिडिटी असेल, तर लिंबू पाण्याच्या सेवनामुळे तुमची समस्या आणखीन वाढू शकते. कारण- लिंबामध्ये असणारे आम्ल पोटात आणखीन जास्त आम्ल तयार करते, ज्यामुळे छातीत आणि घशात जळजळ होते.
५. अॅलर्जी
अमेरिकन कॉलेज ऑफ अॅलर्जी, अस्थमा अँड इम्युनोलॉजीने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, काही लोकांना लिंबूवर्गीय फळांपासून अॅलर्जी असते. त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवली, तर लिंबू-पाण्याचे सेवन करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.