सणवार आला किंवा काही विशेष गोष्ट आली तर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात येतात. साहजिकच अनेकजण यावर तुटून पडतात. दुकानात जाऊन खरेदी करण्याप्रमाणेच ऑनलाइन खरेदीला नेटिझन्स मोठी पसंती देत असल्याने याठिकाणीही अनोख्या ऑफर्स जाहीर करण्यात येतात. दिवाळीला अवघे काही तास बाकी असताना फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर पुन्हा एकदा बंपर सेल सुरु झाला आहे. यामध्ये अनेक आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या असून ग्राहकांना पुढचे ३ दिवस या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

यामध्ये अगदी लहानसहान वस्तूंपासून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल अशा अनेक वस्तूंवर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये व्यक्तीला घरबसल्या आपल्याला हवी ती वस्तू अगदी काही वेळात खरेदी करता येते. इतकेच नाही तर ही वस्तू घरपोचही मिळते. अनेक जण एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू देण्यासाठीही ऑनलाईन खरेदीला पसंती देताना दिसतात.

अॅमेझॉनने दिवाळीच्या निमित्ताने याआधीही एक ऑफर सेल जाहीर केला होता, आता हा दुसरा सेल आहे. तर फ्लिपकार्टचा मात्र दिवाळीच्या निमित्ताने असणारा हा पहिलाच सेल आहे. या दोन्ही वेबसाईटसवर १७ ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला घरात किंवा स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास ही संधी चुकवू नका.

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये विविध कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असताना या बंपर सेलमध्ये काही मोबाईलवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. याशिवाय सेलच्या काळात दररोज दुपारी १२ वाजता फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिला सेल पॅनासॉनिक एल्युगा रे X चा असेल, जो ६ हजार ९९९ रुपयांमध्ये म्हणजेच २ हजारांनी स्वस्त खरेदी करता येईल.