Diwali Padwa 2025: प्रकाशमय आणि आनंदाच्या दिवाळी सणाचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा म्हणजेच बालिप्रतिपदा. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. यंदा हा सण २२ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा होत आहे. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी सोने खरेदी, व्यवसायाची सुरूवात आणि सुवासिनींनी पतीला ओवाळणे याला महत्त्व असते. शिवाय या दिवशी पंचरंगी रांगोळी काढून बळीराजाची प्रतिमा रेखाटली जाते आणि तिची पूजा केली जाते. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी मनोभावे प्रार्थना केली जाते.
पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण का केले जाते?
- दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करण्याची परंपरा आहे. सत्यवान-सावित्रीच्या पातिव्रत्याच्या स्मरणार्थ ही प्रथा मानली जाते. यामध्ये सावित्रीने तिच्या दृढ निश्चयाने सत्यावानाला मृत्यूपासून वाचवलं होतं. म्हणूनच या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात.
- तसंच बालिप्रतिपदेचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. याच दिवशी उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांनी शत्रूंवर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ विक्रम संवत कालगणनेची सुरूवात झाली. त्यामुळे हा ऐतिहासिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस ठरतो.
- व्यापारी वर्गासाठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो, कारण ते या दिवशी हिशेबाच्या नव्या वह्यांचं पूजन करत नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात करतात.
पाडव्याचा शुभ मुहूर्त
या वर्षी दिवाळी पाडवा २२ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या दिवशी तीन मुख्य मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत आहे. दुसरा शुभ मुहूर्त सकाळी १०.५६ पासून दुपारी १२.२३ पर्यत आहे. तर तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी ४.२४ पासून ६.०९ पर्यंत आहे.