Bathroom Cleaning Hacks : बाथरुममधील आरसा सतत पाणी आणि साबणाचे डाग तसेच गरम पाण्याच्या वाफेमुळे अस्वच्छ दिसू लागतात. यामुळे आरसा इतका चिकट, घाणेरडा होतो की अनेकदा त्यावर आपला चेहराही स्पष्ट दिसत नाही. हे डाग काढण्यासाठी बऱ्याचदा लोक महागडे क्लिनिंग प्रोडक्ट्स खरेदी करतात, पण त्यानेही हे डाग दूर होत नाहीत; पण आम्ही तुम्हाला एक रुपयाही खर्च न करता आरसा कसा स्वच्छ करायचा हे सांगणार आहोत.

यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ ठेवावे लागतील, कारण त्या पदार्थांच्या मदतीनेच तुम्ही बाथरुमचा आरसा अगदी नवीन आणि चमकदार करू शकता.

बाथरुममधील आरसा स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स ( Bathroom Mirror Cleaning Hacks)

लिंबाचे साल

लिंबाचा वापर जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात केला जातो. अनेकदा आपण लिंबू वापरल्यानंतर त्याचे साल फेकून देतो. पण, हे साल आरसा स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर लिंबाचे साल बाथरूममधील आरशावर घासले आणि काही वेळाने ओल्या कापडाने आरसा पुसला तर त्यावरील घाणेरडे डाग निघून जातील, आरसा पुन्हा नव्यासारखा चमकेल आणि तो पूर्णपणे स्वच्छ होईल.

न्यूजपेपर

आरसा स्वच्छ करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. जर तुम्हाला तुमच्या बाथरूममधील आरसा चमकदार बनवायचा असेल तर जुना न्यूजपेपर लिंबाचा रस आणि व्हिनेगरने ओला करा. त्यानंतर त्या ओलसर न्यूजपेपरने आरसा घासून घ्या. यामुळे आरशावरील डाग आणि चिकटपणा पूर्णपणे स्वच्छ होईल, तसेच तुमचा आरसा अगदी नवीन आणि चमकदार दिसेल.

चहा पावडर

चहा पावडरच्या पाण्यानेही बाथरुममधील आरशाची चमक परत आणता येईल. यासाठी चहा पावडर पाणी स्प्रे बाटलीत भरा. हे पाणी तुमच्या बाथरूमच्या घाणेरड्या आरशावर स्प्रे करा आणि आरसा सूती कापडाने पूर्णपणे पुसून घ्या. चहा पावरडरमध्ये असलेले टॅनिन आरशावर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करतात आणि तुमचा आरसा पुन्हा चमकदार दिसतो.

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीमध्ये सायट्रिक अॅसिड आणि लिमोनिनसारखे नैसर्गिक तेलदेखील असते, जे क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. यासाठी लिंबाच्या सालींप्रमाणेच, ताज्या संत्र्याच्या सालींचा पांढरा भाग थेट आरशावर घासा. तुम्ही संत्र्याच्या साली व्हिनेगरमध्ये भिजवून काही आठवडे ठेवू शकता. हे ‘सायट्रस इन्फ्यूज्ड व्हिनेगर’ पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. हे द्रावण आरसे आणि इतर काचेचे टीपॉय, खिडक्या स्वच्छ करण्यासाठी नॅच्यरल क्लिनर म्हणून काम करते. याच्या वापराने आरशावरील चिकट डाग निघून जातात आणि आरसा एकदम चमकदार दिसू लागतो.