हृदय, मेंदू, फुफ्फुसे, मूत्रपिंडे या मानवी शरीरातल्या अतिमहत्वाच्या इंद्रियांमध्ये यकृताचासुध्दा समावेश होतो. दैनंदिन चयापचय क्रियेत यकृत अनेक महत्वाची कार्ये बजावते. आता ही कामे नेमकी कोणती आहेत पाहूयात…
अन्नपचनातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त साखरेचा ग्लुकोजच्या स्वरूपात साठा करणे आणि शरीरक्रियेच्या उर्जेसाठी हे ग्लुकोज वापरणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे.
* निकामी झालेल्या लाल रक्तपेशींवर प्रक्रिया करणे.
* आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
* निकामी  हिमोग्लोबिनवर  प्रक्रिया करून बिलिरुबिनची निर्मीती करणे.
* पित्तरस तयार करून त्यायोगे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
* दैनंदिन आहारातल्या घटकामधून कोलेस्टेरॉल बनवणे आणि त्याची पातळी नियंत्रित ठेवणे.
* शरीरातील अनावश्यक गोष्टींचा, विषारी द्रव्यांचा, रासायनिक पदार्थांचा, अनैसर्गिक पदार्थांचा निचरा करणे

कावीळ

यकृताच्या बहुसंख्य आजारात बिलीरुबिनचे उत्सर्जन कमालीचे वाढते. त्यामुळे बाह्य त्वचा आणि डोळ्यातला पांढरा भाग पिवळा दिसतो, तसेच गडद पिवळी लघवी होते. यालाच कावीळ म्हणतात. मात्र कावीळ हा आजार नसून अनेक आजारात आढळणारे एक लक्षण असते. वैद्यकीय परिभाषेत कावीळ म्हणजे ‘इक्टेरस’ आणि ज्या आजारात हे लक्षण दिसते, त्याला ‘हीपॅटायटीस’ म्हणतात. मात्र मराठीत यकृताच्या सर्वच आजारांना कावीळ म्हणून संबोधले जाते. त्यातही पोटातील कावीळ, सफेद कावीळ अशी अशास्त्रीय नावे ऐकायला मिळतात. कावीळ ही अनेक प्रकारची असते आणि कावीळ होण्याची कारणेदेखील अनेक असतात. या विविध कारणांवरूनच काविळीचे उपचार ठरवले जातात.

काविळीचे प्रकार

१. शरीरक्रियांमधील दोष

२. अवरोधक कावीळ

३. यकृत सुजेची कावीळ

४. मद्यप्राशनाने होणारी

५. औषधांमुळे होणारी कावीळ

६. जन्मजात आजार

७. विषाणूंमुळे होणारी कावीळ

‘हे’ पदार्थ कच्चे खाल्ल्यास लाभदायक

विषाणूजन्य कावीळ

फक्त यकृताच्या पेशींवर हल्ला करून ते जायबंदी करणाऱ्या सहा प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळ होते. याचे सहा उपप्रकार आहेत. ए,बी,सी,डी,इ आणि जी हे ते प्रकार मानले जातात. यातले ए, बी आणि सी हे जास्त प्रमाणात आढळतात. विषाणूजन्य कावीळ हा जागतिक आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे. साहजिकच ती होण्याची कारणे आणि प्रतिबंधक उपाय माहित असणे गरजेचे आहे.

नियमित टोमॅटो खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका!

कावीळ टाळण्यासाठी उपाय 

* ‘ए’ आणि ‘इ’ हे प्रकार दूषित अन्न आणि पाणी तसेच प्रदूषित समुद्र मासळी यांच्या सेवनातून हा विकार होतो. त्यामुळे भेळपुरी, पाणीपुरी, वडापाव, सामोसे, भाजी, अंडाभुर्जी अशा तोंडाला पाणी सुटणाऱ्या रस्त्यावरील खाद्य टाळावे.

* हातगाडीवरील शीतपेये आणि ज्यूस आणि रसाची गुऱ्हाळे यातील बर्फ अप्रमाणित आणि दूषित असू असल्याने त्यांचा मोह टाळावा.

* ताजे, गरम आणि घरी शिजवलेले, पचनास हलके अन्न घ्यावे.

* मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींनी ग्लुकोज साखरेचे पाणी, उकळून गार केलेले साधे पाणी २-३ लिटर प्यावे.

* ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ हे प्रकार असुरक्षित लैंगिक संबंधातून होतात. केवळ नैतिकतेच्याच नव्हे तर आरोग्यासाठी या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

* हे आजार बाधित रक्तदानामधून पसरतात. त्यासाठी प्रमाणित रक्तपेढ्यांमधील रक्त वापरावे.

* ए, आणि बी या काविळींच्या लसी सर्व लहान मुलांना द्याव्यात आणि ज्येष्ठांनीदेखील घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित, लैंगिक व्यवसायांशी संबंधित सर्व व्यक्तींनी या लसी घेणे आवश्यक असते.

 

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know what is jaundice and how to take care in it