How to Clean Mixer Grinder: पाटा- वरवंटा जाऊन आता प्रत्येक घरात मिक्सर आले आहेत. काही सेकंदात तासांचे काम उरकणारे मिक्सर आता लक्जरी नव्हे तर अत्यावश्यक व गरजेची वस्तू ठरले आहेत. पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जितका वेळ मिक्सर वाटण करण्यात कमी करतो तितकाच वेळ हे मिक्सर स्वच्छ करण्यात जातो. विशेषतः तुम्ही जेव्हा कांदा- खोबऱ्याचे वाटप किंवा चटण्या वाटता तेव्हा त्यातील पाण्याचे ओघळ मिक्सरच्या आत जाऊ शकतात. हे डाग इतके चिवट असतात की ते जाता जात नाहीत. अनेकदा तर कंटाळा करून आपण मिक्सर वरवर पुसून ठेवून देतो यामुळे तर हे डाग निघणं अजून कठीण होऊ शकतं. आज आपण तुमचा वेळ वाचवणारे काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

1) एका वाटीत १ चमचा डिटर्जंट घ्या, त्यात दोन चमचे व्हिनेगर घालून पेस्ट तयार करा. आता टूथब्रश किंवा सुती कापडाच्या मदतीने मिक्सर ओले करा. ब्रशवर ही पेस्ट घ्या, या पेस्टने मिक्सर घासा. थोड्या वेळा नंतर मिक्सर कोरड्या कापडाने पुसून काढा.

2) मिक्सरच्या कडा या साफ करण्यासाठीचा सर्वात कठीण स्पॉट मानला जातो, कारण अनेकदा तिथे कापड पोहोचतच नाही. यासाठी तुम्ही इअरबड्सचा वापर करू शकता, किंचित ओला करून तुम्ही इअरबडने या कडा पुसू शकता.

3) मिक्सरचं भांडं वापरल्यानंतर, आपण भांडं स्वच्छ करतो, परंतु त्याचा मागील भाग तसाच राहून जातो. हा भाग साफ करण्यासाठी एका वाटीत मीठ, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मिक्सर ग्राइंडरच्या खालील भागात लावून ठेवा. ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा. तुम्ही टूथब्रशचा सुद्धा वापर करून मिक्सर स्वच्छ करू शकता.

4) राहता राहिला प्रश्न वेळेचा, आम्हाला माहित आहे की रोज पेस्ट बनवून मिक्सर साफ करणे हे काही शक्य नाही. तुम्ही आठवड्यातून एकदा ही पूर्ण प्रक्रिया करू शकता व अन्य वेळांसाठी तुम्ही हे मिश्रण लिक्विड स्वरूपात टाकून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा, चटण्या- वाटप झाल्यावर तुम्ही हे लिक्विड स्प्रे करून सुक्या कापडानेच पुसून घ्या.

हे ही वाचा<< तुमचे कान किती वर्षाचे आहेत? ही ऑडिओ टेस्ट होतेय तुफान व्हायरल, रिझल्ट बघून व्हाल थक्क

बेकिंग सोडा व्हिनेगरची पेस्ट बनवताना हातात प्लास्टिक ग्लोव्ह्ज वापरणे उत्तम अन्यथा त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो.