Early Signs Kidney Problems Eyes: डोळे हे फक्त आत्म्याचं नव्हे, तर शरीराच्या आरोग्याचंही आरशाप्रमाणे प्रतिबिंब दाखवतात हे ऐकलं असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या मूत्रपिंडांच्या (किडनी) कार्यात गडबड सुरू होताच त्याची पहिली चिन्हं अनेकदा डोळ्यांत दिसतात? अनेकांना वाटतं की, किडनीचं आजारपण म्हणजे फक्त सूज, थकवा किंवा लघवीत बदल; पण तज्ज्ञ सांगतात की, काही वेळा डोळ्यांतील लक्षणं हाच पहिला इशारा असतो, जे शरीर देत असतं.

हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रॉलॉजी अँड युरॉलॉजीचे वरिष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. सुजित रेड्डी बांडे यांच्या मते, “डोळ्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, विशेषतः मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी. कारण- हे दोन्ही आजार किडनीच्या कार्यावर थेट परिणाम करतात.” तर पाहू या, डॉ. बांडे यांनी सांगितलेले किडनीच्या बिघाडाची शक्यता दर्शवणारे डोळ्यांतील ५ महत्वाचे संकेत…

१. सकाळी उठल्यावर डोळ्यांखालची सूज

जर सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती फुगीरपणा किंवा सूज जाणवत असेल, तर ते किडनीतील प्रथिनगळतीचं (प्रोटीनयुरिया) लक्षण असू शकतं. जेव्हा किडनीचं फिल्टरिंग सिस्टीम कमकुवत होतं, तेव्हा रक्तातील प्रथिनं लघवीतून बाहेर पडतात आणि हेच सुजेचं कारण ठरतं. सुरुवातीला पायांपेक्षा डोळ्यांखालील सूज आधी दिसते.

२. धूसर दिसणे

जर वारंवार दृष्टी धूसर होत असेल, तर तो केवळ डोळ्यांचा त्रास नसून, किडनीच्या कार्यात बिघाड दाखवू शकतं.
मधुमेह किंवा उच्च रक्तदाबामुळे रेटिनातील रक्तवाहिन्या कमजोर होतात (डायबेटिक किंवा हायपर टेन्सिव्ह रेटिनोपॅथी). या स्थितीत दृष्टी मंदावते, तर काही वेळा अचानक अंधत्वही येऊ शकतं.

३. कोरडे किंवा खाज सुटणारे डोळे

दीर्घकालीन किडनी विकार (chronic kidney disease) झाल्यास रक्तात अपायकारक द्रव्यं (युरेमिक टॉक्सिन्स) साचतात. त्यामुळे अश्रूंचं उत्पादन कमी होतं आणि डोळ्यांना कोरडेपणा, खाज वा जळजळ जाणवते. या अवस्थेत डोळ्यांच्या पटलाचं नुकसान होण्याचाही धोका असतो.

४. लाल किंवा रक्ताळलेले डोळे

जर डोळे नेहमी लाल, थकलेले किंवा सुजलेले दिसत असतील, तर ते फक्त झोपेच्या अभावामुळे घडत नाही. किडनीच्या आजारामुळे रक्तातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये सूज (इम्फ्लेमेशन) येते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसतो. काही स्वप्रतिरोधक आजार (autoimmune disorders) जसे की, ल्युपस किंवा व्हॅस्क्युलायटिस हेही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

५. अचानक दृष्टी कमी होणे

जर एकदम दृष्टी धूसर झाली किंवा दिसणं थांबलं, तर ते वैद्यकीय आणीबाणीचं लक्षण आहे. ही गोष्ट रेटिनातील रक्तप्रवाह अडथळा, उच्च रक्तदाबाचा झटका किंवा डायलिसीसशी संबंधित गुंतागुंत यांमुळे होऊ शकते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास किडनीचं नुकसान झपाट्यानं वाढू शकतं.

शेवटचा इशारा :

डोळ्यांतील ही लक्षणं दिसताच ती फक्त डोळ्यांची समस्या नाही, असं समजा. ती शरीरातल्या किडनीच्या बिघाडाची सुरुवातही असू शकते. डॉ. बांडे सांगतात, “ही लक्षणं दिसली, तर त्वरित नेफ्रॉलॉजिस्ट किंवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- वेळेत उपचार मिळाले, तर किडनी आणि दृष्टी दोन्ही वाचू शकतात.”

तुमचे डोळे आरशासारखे आहेत, जे शरीरातील बिघाडाचे संकेत आधी देतात. म्हणून पुढच्या वेळी आरशात स्वतःकडे पाहताना फक्त डोळ्यांचं सौंदर्य नव्हे, तर त्यात दिसणारा आरोग्याचा इशारा ओळखा!