फेसबुकने ‘फेसबुक पे’ या नावाने नवीन पेमेंट सिस्टीम सादर केली आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे. ही प्रणाली पहिल्यांदा अमेरिकेत सादर करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील युजर्ससाठी याला उपलब्ध करण्यात येणार आहे.

फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटस अ‍ॅपचे युजर्स फेसबुक पे प्रणालीचा वापर करू शकणार आहेत. म्हणजेच मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटस अ‍ॅपवरुनच तुम्हाला पेमेंट करता येईल. याचा वापर करण्यासाठी युजर आपल्याकडे असणार्‍या क्रेडीट वा डेबीट कार्डसह पे-पाल सिस्टीमचा वापर करू शकतील. अर्थात, ‘फेसबुक पे’ वापरण्याआधी युजरला प्रत्यक्ष देवाण-घेवाण करण्यासाठी क्रेडीट किंवा डेबीट कार्ड अथवा पे-पाल अकाऊंटशी याला संलग्न करावे लागेल. यानंतर युजर याचा वापर करू शकतील.

आणखी वाचा- तुमच्या YouTube चॅनलवरुन उत्पन्न मिळतं का? नसेल तर वाचाच

‘फेसबुक पे’ प्रणालीच्या माध्यमातून अत्यंत सहज आणि अतिशय सुरक्षितपणे व्यवहार करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात युजर पीन क्रमांक तसेच फेस आयडी अथवा टच आयडीचे सुरक्षा कवचदेखील लावण्याची सुविधा मिळेल. यामध्ये युजरची बायोमॅट्रीक माहिती सेव्ह करत नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. ही प्रणाली भारतात लाँच झाल्यानंतर युजर फेसबुक अॅप किंवा फेसबुकच्या संकेतस्थळावर सेटिंगमध्ये जाऊन पेमेंट पद्धत सेव्ह करु शकतील.