5 Ways You Should Not Be Sitting While At the Office : आपल्यातील अनेक जण लॅपटॉपवर काम करतात. लॅपटॉपवर काम करताना आपण फक्त वॉशरूम किंवा अगदी जेवणासाठी जागेवरून उठतो. काही जण तर अगदी तेही करायला कंटाळा करतात आणि जागेवरच बसून डबा खातात, ज्याचा हळूहळू आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. तासन् तास एकाच ठिकाणी काम करत बसल्यामुळे पाठ, मान व गुडघ्यांवर परिणाम तर होतोच. त्यापैकी एक म्हणजे डेस्कवर जास्त वेळ बसल्याने तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने तुमचे स्नायू कमकुवत होतात, रक्तप्रवाह मर्यादित होतो, शरीर कडक होते तसेच बसण्याच्या अयोग्य स्थितीमुळे तुमच्या सांध्यांवर ताण येऊ लागतो.
त्यामुळे गुडघ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी वेळीच आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कसे बसता? कोणत्या चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या गुडघ्यांना नुकसान पोहोचू शकते हे जाणून घेण्यासाठी बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
गुडघ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या बसण्याच्या पद्धती
पायांची मांडी घालून बसणे – पायांची मांडी घालून बसल्याने गुडघे, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागावर असमान दाब पडतो. कालांतराने, त्यामुळे तुमच्या गुडघ्यांच्या सांध्यांवर ताण येऊन, त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे शरीरात कडकपणा येतो आणि अस्वस्थता निर्माण होते.
खुर्चीची उंची कमी करणे – खुर्चीची उंची कमी करून तुम्ही बसत असाल, तर तुमचे गुडघे खूप वाकलेल्या (९०° पेक्षा कमी) स्थितीत राहतात. त्यामुळे गुडघ्यांच्या हाडांचे सांधे आणि स्नायू यांवर जास्त ताण येतो. बसण्याची योग्य स्थिती अशी असते की, गुडघे साधारण ९०° ते १००° कोनात असावेत आणि पाय जमिनीवर सरळ टेकलेले असावेत.
पाय हवेत ठेवणे (जमिनीला स्पर्श न करणे) – जेव्हा पाय जमिनीवर टेकत नाहीत, तेव्हा शरीराचे वजन गुडघ्यांकडे सरकते. त्यामुळे अनावश्यक दबाव निर्माण होतो, ज्यामुळे कालांतराने वेदना किंवा सूज येते.
डेस्कपासून खूप दूर बसणे – डेस्कपासून खूप लांब बसल्यास तुम्हाला पोक काढून किंवा वाकून बसावे लागते. त्यामुळे पायांवर ताण पडतो किंवा तोल सांभाळण्यासाठी पाय जबरदस्तीने ताठ ठेवावे लागतात. अशा वेळी मांडीमागच्या स्नायूंना (हॅमस्ट्रिंग) जास्त ताण आणि गुडघ्यांवर सतत दाब येतो.
तासभर हालचाल न करणे – एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने पायांना रक्तपुरवठा कमी होतो आणि सांध्यांना लागणारे नैसर्गिक तेल (लुब्रिकेशन) कमी मिळते; ज्यामुळे गुडघे कडक होतात आणि हालचाल करायला त्रास होतो. हालचाल कमी झाल्यामुळे गुडघ्यातील कार्टिलेज (कार्टिलेज म्हणजे हाडांच्या टोकांवर असलेला गुळगुळीत, लवचिक थर) लवकर झिजतो आणि संधिवाताची सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात.