‘वॉलमार्ट’ची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने अॅमेझॉनच्या प्राईम व्हिडीओला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा लवकरच सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत असणार आहे. कंपनीकडून अद्याप या सेवेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून फ्लिपकार्ट व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याची चर्चा होती. या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कंपनीकडून विविध भाषांमध्ये व्हिडिओ सामग्री उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरिज इत्यादींचा समावेश असणार आहे.
‘Flipkart Videos’ या नावाने ही नवी सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे. अॅमेझॉनप्रमाणे या सेवेसाठी कंपनीकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, केवळ जाहिरातींद्वारे कमाई करण्याचा कंपनीचा विचार आहे. येत्या दिवाळीपूर्वी ही नवी सेवा फ्लिपकार्ट लाँच करण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे दिवाळीआधीच अधिकाधिक संख्येने ग्राहक जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. या सेवेद्वारे भारतात अजून 20 कोटी ग्राहक जोडले जातील असा विश्वास कंपनीला आहे. सध्या फ्लिपकार्टकडे 15 कोटी युजर्स आहेत. ऑनलाइन शॉपिंगला वाव देण्यासोबतच ग्राहकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना अधिकाधिक वेळेसाठी थांबवून ठेवण्याची कंपनीची रणनिती आहे.
अॅमेझॉनच्या प्राईम व्हिडीओ ही सेवा एका वर्षापर्यंत घेण्यासाठी ग्राहकांना 999 रुपये मोजावे लागतात तर दरमहिन्यासाठी 129 रुपये मोजावे लागतात. दरम्यान, फ्लिपकार्टची स्ट्रीमिंग सेवा सुरू झाल्यास याचा फायदा ग्राहकांना होऊन टेलिकॉम क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातील स्पर्धाही अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.