Foot Problems Symptoms of Disease: आपले शरीर जेव्हा एखाद्या आजाराशी लढत असते, तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे संकेत देते. त्यापैकी एक म्हणजे पायांमध्ये होणारे बदल. पाय केवळ शरीराचे वजन सांभाळत नाहीत, तर आपल्या आरोग्याची झलकही दाखवतात; पण आपण हे अनेकदा दुर्लक्षित करतो. अभ्यासानुसार, पाय सुन्न होणे, सूज येणे, रंग बदलणे किंवा पाय थंड पडणे हे डायबिटीस आणि हृदयाच्या आजारांसारख्या गंभीर रोगांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

जर्नल ऑफ डायबिटीस अँड मेटाबोलिक डिसऑर्डर्समध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, डायबिटिक फूट अल्सर म्हणजे पायावर होणारी जखम, हे रक्तप्रवाह कमी होणे आणि नसांचे नुकसान होण्याचे लक्षण असते, जे हृदयाच्या आजाराच्या धोक्याशी संबंधित असते. तसेच, सर्क्युलेशन (२०२२) मध्ये प्रकाशित संशोधनात सांगितले आहे की, पायांचे असामान्य तापमान, त्वचेचा रंग बदलणे किंवा सूज येणे हे परिघीय धमनी रोगाचे (Peripheral Artery Disease) लक्षण असू शकते, जे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या स्थितींशी जोडलेले आहे.

पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे

जर पायांमध्ये किंवा बोटांमध्ये सतत सुन्नपणा किंवा झिणझिण्या जाणवत असतील, तर ते डायबिटिक न्युरोपथी म्हणजेच नसांमध्ये झालेल्या नुकसानाचे लक्षण असू शकते. ही समस्या साधारणपणे अनियंत्रित डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये दिसते, पण काही वेळा नस दाबली जाणे किंवा मेंदू-नसांच्या इतर त्रासांमुळेही होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, याची वेळेत ओळख होणे खूप गरजेचे आहे, कारण नसांचे नुकसान झाल्यास पायांवर जखमा, संसर्ग आणि व्रण होऊ शकतात, जे पुढे गंभीर रूप घेऊ शकतात.

पायांमध्ये सूज किंवा वेदना

पायांमध्ये सतत सूज येणे, वेदना होणे किंवा जडपणा जाणवणे हे हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. हे अनेकदा हृदयविकार किंवा परिघीय रक्तवाहिन्यांच्या आजाराशी जोडलेले असते. डॉक्टरांच्या मते, अशी सूज चालताना वाढते आणि विश्रांती घेतल्यावर कमी होते. जर ही लक्षणे बराच काळ टिकली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

त्वचेचा रंग बदलणे किंवा न भरणाऱ्या जखमा

पायांची त्वचा कोरडी, फाटलेली किंवा रंग बदललेली दिसत असेल किंवा जखमा खूप दिवसांपर्यंत भरत नसतील, तर हे रक्तप्रवाह कमी होणे किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये ही स्थिती खूप गंभीर ठरू शकते, कारण पायांवरची जखम पुढे संसर्ग किंवा पाय कापण्याच्या स्थितीपर्यंत जाऊ शकते.

पाय थंड पडणे

जर तुमचे पाय नेहमी थंड राहत असतील किंवा त्यांचा रंग निळसर किंवा लालसर दिसत असेल, तर ते परिघीय धमनी रोगाचे (Peripheral Artery Disease – PAD) लक्षण असू शकते. ही समस्या रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. सर्क्युलेशन जर्नल (२०२२) मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, PAD असलेल्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका दुप्पट असतो.

पाय किंवा नखांच्या आकारात बदल

पायांचा आकार बदलत असेल, जसे बोटाजवळ गाठ येणे, बोटे वाकडी होणे (हॅमर टो) किंवा नखं जाड, बुरशी लागलेली दिसत असतील तर हे हाडांच्या रचनेतील बदल किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. काही वेळा असे बदल रुमेटॉइड आर्थ्रायटिससारख्या ऑटोइम्यून आजारांमुळेही होतात. वेळेत ओळख आणि उपचार केल्यास वेदना आणि चालताना होणारा त्रास टाळता येतो.