Home Manicure Tips: धावपळीच्या जीवनात अनेक वेळा महिलांना स्वतःकडे लक्ष देण्याचा वेळ मिळत नाही. घरगुती काम, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि इतर दैनंदिन तणाव यांमुळे अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्योर करायला वेळच मिळत नाही. तर काही महिला अशा आहेत की, ज्यांना वेळ असूनही वारंवार पार्लरमध्ये पैसे खर्च करणे आवडत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचे हात सुंदर आणि मऊ ठेवू इच्छित असाल, पण तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसेल किंवा तुम्हाला पार्लरला जायचे नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. घरच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टींच्या मदतीने तुम्हीही घरच्या घरी हातांची देखभाल करून, त्यांना सुंदर आणि चमकदार बनवू शकता.

घरच्या घरी मॅनिक्योरसाठी लागणारी साधने

लिंबू

साखर

नारळ तेल

गार किंवा कोमट पाणी

बेसन

मध

हे सर्व पदार्थ सहज उपलब्ध आहेत आणि वापरण्यास अतिशय सोपे आहेत. चला आता पाहूया की, या पदार्थांचा वापर करून आपण घरच्या घरी हात कसे सुंदर करू शकतो ते.

१. लिंबू आणि साखरेचा स्क्रब

घरच्या घरी साध्या स्क्रबच्या मदतीने हातांची त्वचा मऊ, स्वच्छ व चमकदार करता येते. त्यासाठी साखरेमध्ये लिंबूचा रस मिसळा. या मिश्रणाने हातांवर हलक्या हातांनी मालिश करा. साखर त्वचेवरील मृत पेशींना काढून टाकते, तर लिंबू त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देतो. नंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हात ओले असतानाच त्यावर नारळ तेल लावा आणि त्यावर हलके मालिश करा. त्यामुळे त्वचेत पोषण मिळते आणि हात मऊ व सुंदर दिसतात.

२. बेसन आणि मधाचा फायदा

बेसन आणि मधाचा वापर करूनदेखील घरच्या घरी मॅनिक्योर करता येते. बेसनात मध मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट हातांवर नीट लावा आणि त्यावर हलके मालिश करा. नंतर थोडे नारळ तेल लावून, पुन्हा हलका मसाज करा. बेसन त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि मधामुळे त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते. त्यामुळे हातांची त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसते.

३. नियमितपणे हायड्रेशन

फक्त स्क्रब आणि मालिश नव्हे, तर हातांना नियमित हायड्रेट करणेही आवश्यक आहे. घरी राहून हातांना वारंवार नारळ तेल किंवा आपल्या आवडत्या मॉइश्चरायझरने मालिश करा. त्यामुळे हातांची त्वचा कोरडी होत नाही आणि सुंदरपणा टिकतो.

४. नैसर्गिक टिप्स

हात स्वच्छ ठेवणे आणि वेळोवेळी त्यांना ओलसर ठेवणे आवश्यक आहे. घरातल्या नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने हातांची त्वचा रासायनिक उत्पादनांपेक्षा अधिक सुरक्षित राहते. दर आठवड्याला एकदा हे घरगुती स्क्रब वापरल्यास हातांची त्वचा नेहमी मऊ, कोमल व चमकदार राहते. घरच्या घरी हे सोपे उपाय वापरल्यास पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. वेळ आणि पैसे वाचवताना हातांची देखभाल करणे सोपे होते. लिंबू, साखर, बेसन, मध व नारळ तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपणही घरच्या घरी सुंदर, मऊ व चमकदार हात मिळवू शकता. त्यामुळे धावपळीत असतानाही हातांची काळजी घेणे आता अवघड नाही.