दिग्गज टेक कंपनी गुगलने (Google) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा कालावधी सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला आहे. गुगलचे जवळपास 2,00,000 कर्मचारी आता सप्टेंबर 2021 पर्यंत आपल्या घरातून काम करु शकणार आहेत. यानंतर जेव्हा ऑफिस सुरू होईल त्यावेळी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस ऑफिसला जावं लागेल, तर उर्वरित तीन दिवस घरातूनच काम करण्याची परवानगी असेल.
अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात एक ईमेल पाठवला असून या मेलमध्ये, लवचिक कार्यपद्धती अवलंबल्याने प्रोडक्टिव्हिटी वाढते की नाही याची आम्ही चाचणी घेत आहोत असं नमूद केलं आहे. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये करोनाची लसदेखील देणार आहे.
मार्च महिन्यामध्ये करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होमची परवानगी देणारी गुगल पहिली कंपनी होती. तेव्हापासून गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा कालावधी सतत पुढे ढकलला आहे. पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पर्यंत, नंतर जुलै महिन्यापर्यंत आणि आता सप्टेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवण्यात आला आहे.