How to Grow Elaichi Plant: स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी वेलची केवळ मसाल्यांची राणी म्हणूनच ओळखली जात नाही, तर ती आरोग्यासाठीही अमूल्य खजिना मानली जाते. साधारणपणे आपण बाजारातून विकत घेतो ती छोटीशी हिरवी वेलची; पण जर तीच आपल्या घरच्या अंगणात किंवा अगदी कुंडीत उमलली तर? ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं; पण हे खरं आहे. योग्य पद्धतीने व थोडी काळजी घेतली, तर तुम्हीही घरच्या कुंडीत वेलचीचे झाड उगवू शकता. पण, या प्रक्रियेत एक गुपित दडलंय. कारण- हा प्रवास साधा नाही, तर संयम, काळजी आणि निसर्गाशी जुळलेलं नातं यातूनच फळाला येतं.

वेलचीसाठी आवश्यक तयारी

वेलची पेरण्यासाठी ताजे आणि दर्जेदार बियाणे लागते. बाजारात मिळणाऱ्या सुक्या वेलचीच्या बिया अंकुरत नाहीत. त्यामुळे शेतकीसाठी खास उपलब्ध होणारे बियाणे घ्यावे लागते. कुंडी किमान १२ इंच खोल असावी आणि त्यात ओलसर माती व सेंद्रिय खत मिसळलेलं असणं आवश्यक आहे.

बियाणे पेरण्याची पद्धत

बियाणे लावण्याआधी ते २४ तास पाण्यात भिजवावं लागतं. भिजलेल्या बिया थोड्या उथळ मातीखाली दडवा आणि कुंडी छायादार जागी ठेवा. लक्षात ठेवा, वेलचीला प्रखर ऊन अजिबात झेपत नाहीत; जास्तीचं ऊन हे बियाणं वाळवून टाकू शकतं.

ओलसर आणि खताची काळजी

या रोपट्याला पाणी प्रिय असतं; पण पाण्याचा अतिरेक धोकादायक ठरतो. माती कायम ओलसर ठेवावी; पण चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी. पानांवर हलके पाणी फवारल्यास झाड ताजे राहण्याची शक्यता दुप्पट वाढते. दर १५ दिवसांनी सेंद्रिय खत टाकल्यास झाडाच्या वाढीला जणू गती मिळते.

संयमाची खरी परीक्षा

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वेलचीच्या झाडाचं रहस्य म्हणजे संयम. बियाणे अंकुरायला साधारण ३० ते ४० दिवस लागतात. पण, वेलचीची खरी फळं दिसण्यासाठी तब्बल दोन-तीन वर्षांचा कालावधी लागतो. होय! इतका दीर्घ काळ वाट पाहणं गरजेचं आहे. एकदा झाड प्रगल्भ झालं की, त्यावर सुंदर हिरव्या शेंगा उमलतात, त्या शेंगा वाळवून संग्रह केल्यावर मिळते ती आपल्या ओळखीची सुवासिक वेलची.

बाजारातल्या चकचकीत पाकिटांऐवजी जर तुम्हाला कुंडीतील हिरवीगार वेलची हवी असेल, तर थोडा संयम, थोडी काळजी व निसर्गावर श्रद्धा या तिघांचा संगम व्हावा लागतो. मग काय, तुम्ही तयार आहात का घरच्या घरी वेलचीचं गुपित उलगडायला?