Change your daily habits: आपण बऱ्याचदा असा विचार करतो की, आपल्या रोजच्या किरकोळ सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट काही परिणाम होत नाही. मात्र, या लहान लहान सवयी आपल्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. या सवयी हळूहळू आपले हृदय, पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे भविष्यात मोठ्या आरोग्य समस्या टाळण्यासाठी त्या ओळखणे आणि बदलणे हाच एकमेव उपाय आहे. नेमक्या कोणत्या सवयी तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात ते जाणून घ्या…
सकाळचा नाश्ता वगळणे
दिवसाची सुरूवात ही योग्यप्रकारे होणं गरजेचं आहे. सुरूवातीलाच सकाळी नाश्ता वगळल्याने चयापचय मंदावतो आणि ऊर्जा कमी होते. यामुळे दीर्घकाळाने लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
जास्त वेळ बसून राहणे
कामावर असो वा घरी सतत बसून राहिल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि पाठदुखी होऊ शकते. लहान ब्रेक घेणे, स्ट्रेचिंग करणे किंवा काही वेळ चालणे या सवयी धोके कमी करू शकतात.
झोपण्यापूर्वी मोबाईल फोनचा जास्त वापर
मोबाईल फोन किंवा इतर स्क्रीन ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी समस्या ठरली आहे. स्क्रीनचा निळा प्रकाश झोपेमध्ये व्यत्यय आणतो आणि मेलाटोनिन हार्मोन कमी करतो. कमी झोपेचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय आणि मेंदूच्या आरोग्यावर होतो.
डिहायड्रेशन
पाणी कमी प्यायल्याने देखील गंभीर आजार उद्भवू शकतात. सतत कमी पाणी प्यायल्याने मूत्रपिंड, पचन आणि त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. दररोज दोन ते अडीच लिटर पाणी पिणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय तहान लागल्यास साखरयुक्त पेये टाळण्याचा प्रयत्न करा.
साखरेचे अतिसेवन
वारंवार गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते आणि डायबिटीज तसंच फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी फळे, काजू किंवा डार्क चॉकलेटचा पर्याय निवडा.
बसण्याची चुकीची पद्धत
वाकून बसणे, पोक काढून बसणे किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे मणक्यावर परिणाम करू शकतात. यामुळे पाठदुखी वाढू शकते आणि फुप्फुसांची क्षमता कमी होऊ शकते.
ताणतणाव आल्यास दुर्लक्ष करणे
सततचा ताण उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतो. दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे किंवा थोडा वेळ चालणे यामुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
रात्री उशिरा जेवणे
रात्री उशिरा जेवल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, वजन वाढू शकते आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो. रात्रीचे जेवण हे झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी घ्यावे.
अशा लहान सवयी सामान्य वाटू शकतात. मात्र, त्या हळूहळू आरोग्याला नुकसान करत असतात. त्या वेळीच ओळखून बदल करून तुमचे शरीर निरोगी, उत्साही आणि रोगमुक्त राहण्यास मदत होऊ शकते.