Health benefits of Gond Katira : गोंद कतीरा या सरबताचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. पण, अनेकांना प्रश्न पडेल की, गोंद कतीरा म्हणजे काय? तर गोंद कतीरा हा एक डिंकाचा प्रकार आहे, ज्याला ट्रॅगाकांथ गम म्हणूनदेखील ओळखले जाते. हे अ‍ॅस्ट्रॅगॅलस वनस्पतीच्या एका प्रजातीच्या रसापासून मिळालेले औषध आहे. गंधहीन व चवहीन असलेला हा पदार्थ शतकानुशतके आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो, जो शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी पचनासह हलका आणि औषधी गुणधर्मांसाठीही वापरला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाण्यात भिजवल्यानंतर या डिंकाचे जेलीसारख्या पदार्थात रूपांतर होते. स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. विशेषत: डिंकाचे लाडू बनविण्यापासून ते विविध पदार्थांमध्येही तो वापरला जातो.

हा डिंक नॅचरली पॉलिसेकेराइड्स, फायबर, कॅल्शियम व अल्कलॉइड्सने समृद्ध आहे. तो शरीरास थंडावा देण्यासही मदत करतो. त्यामुळे उन्हाळ्यात या डिंकाचे सेवन फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त त्यातील हाय फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.

फोर्टिस हॉस्पिटल फरिदाबादच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट किरण दलाल यांच्या मते, गोंद कतीराचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

१) नैसर्गिकरीत्या शरीरात थंडाव्याची निर्मिती

गोंद कतीरा या डिंकातील थर्मोरेग्युलेटरी गुणधर्मांमुळे उष्माघात रोखण्यास आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. विशेषतः या डिंकामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होते आणि थंडावा मिळतो.

२) पचनक्रियेचे आरोग्य राखण्यास मदत

त्यातील फायबरमुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास रोखण्यास साह्य मिळते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

३) वजन नियंत्रणात राहते

या डिंकाच्या सेवनाने शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत होते. तसेच, पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४) रोगप्रतिकार शक्ती वाढते

गोंद कतीरामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स घटक असतात, जे विविध आजारांशी लढण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.

५) महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

गर्भधारणेनंतर हाडे मजबूत करण्यासाठी डिंकाचे सेवन केले जाते. त्याशिवाय नव्याने आई होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास दूर करण्यासाठीही मदत होते.

६) पुरुषांची प्रजनन क्षमतेत सुधारणा

काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, या डिंकाच्या सेवनाने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.

७) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

या डिंकाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका कमी होतो.

८) त्वचेचा कोरडेपणा व जळजळ टाळण्यास उपयुक्त

या डिंकातील हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चराईझ होते, ज्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा आणि जळजळ टाळता येते. त्याशिवाय ब्युटी पार्लरमधीस फेस मास्कमध्ये याचा वापर केला जातो.

या डिंकाचा वापर कशा प्रकारे करावा?

१) पाण्यात भिजवून : गोंद कतीरा खाण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तो रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि जेलीसारखा त्याचा वापर करा. त्यानंतर तुम्ही चवीसाठी ते दूध, साखर किंवा फ्लेवर्ड सिरपमध्ये मिसळून ते पेय प्या.

२) सरबताबरोबर प्या : उन्हाळ्यात थंडाव्यासाठी तुम्ही लिंबूपाणी, गुलाबाचे सरबत व लस्सी यांसारख्या पेयांबरोबरही पिऊ शकता.

3) गोड पदार्थांसह खा : फालुदा, खीर व कुल्फी यांसारख्या गोड पदार्थांमध्ये मिसळूनही तुम्ही तो खाऊ शकता.

४) त्वचेवर असा करा वापर : गुलाबपाणी किंवा कोरफड जेलमध्ये मिसळून, तुम्ही त्यापासून हायड्रेटिंग फेस मास्क बनवू शकता. हा मास्क कोरड्या आणि पिंपल्स असलेल्या चेहऱ्यावर थंडावा देण्यास मदत करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of gond katira ancient remedy for summers improving digestion to cooling properties sjr