Is Eating Garlic Harmful For You : लसूण हा स्वयंपाकासाठी घराघरात वापरला जातो. पण, लसणाचा वापर केवळ जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठीच नाही तर पूर्वीपासून वेगवेगळ्या उपचारांमध्येही केला जातो आहे. आयुर्वेदात, लसणाच्या सेवनाचा वापर अनेक जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी केला जायचा. लसूण पाकळ्या लिली वनस्पतीपासून मिळतात आणि जगभरात, विशेषतः इजिप्त, ग्रीस, रोम, चीन आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा खूप वापर केला जातो. लसणाची विशिष्ट चव आणि वास हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात त्याचा जास्त वापर होतो. पण, फक्त लसूण नाही तर लसूण पावडर आणि टायचे तेल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

एम्सचे माजी सल्लागार आणि सौल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर विमल छाजेर म्हणाले की, लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे सक्रिय संयुगे असतात; ज्यामध्ये दाहक-विरोधी, अँटीफंगल, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. लसूण उच्च रक्तदाबा असणाऱ्या रुग्णांसाठी औषध म्हणून काम करतो. दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते. असंख्य अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, लसणाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित होतो आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

लसणाचे सेवन आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घेऊयात…

लसणाचे फायदे – लसूण मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो; त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत ठेवतो. यामुळे उच्च रक्तदाब (बीपी) नियंत्रित राहते आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होते. वाईट कोलेस्टेरॉल हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे लसणाचे सेवन केल्याने रक्त प्रवाह सुधारतो.

अ‍ॅलिसिनमध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात; जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हा मसाला पचनसंस्था सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्याचे सेवन केल्याने गॅस, पोटफुगी, अपचन यापासून आराम मिळतो. दररोज लसूण खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्याचे सेवन केल्याने जळजळ नियंत्रित होते आणि त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात.

लसूण खाण्याच्या चुकीच्या पद्धती कोणत्या ?

  • लसूण तोडल्याशिवाय किंवा सोलल्याशिवाय थेट सेवन करणे चुकीचे आहे. यामुळे अ‍ॅलिसिन सक्रिय होत नाही आणि त्याचे फायदे कमी होतात.
  • जास्त लसूण खाणे ही आणखी एक मोठी चूक आहे.
  • प्रत्येक वेळी जेवताना खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, रक्तस्त्राव आणि पोटदुखी होऊ शकते.
  • रिकाम्या पोटी जास्त लसूण खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे; यामुळे जळजळ किंवा गॅस वाढू शकतो.
  • वाळलेला लसूण वापरणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे.
  • जुना लसूण खाल्ल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात.

मग लसणाच्या सेवनाची योग्य पद्धत कोणती?

  • लसूणाची एक पाकळी सोलून १० मिनिटे तशीच राहू द्या. यामुळे त्यातील अ‍ॅलिसिन सक्रिय होईल.
  • सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन लसूण पाकळ्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
  • लसूणाची एक पाकळी घ्या आणि ती १ कप पाण्यात उकळवून घ्या. त्यात थोडी दालचिनी घाला आणि गाळून घ्या. मग १ चमचा मध घालून त्याचे सेवन करा.
  • यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • तुम्ही भाज्यांमध्ये कुस्करलेले लसूण घालून खाऊ शकता.