वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : मानवी शरीराच्या पचनसंस्थेत आतडय़ांची मोठी भूमिका असते. आतडय़ांचे आरोग्य चांगले असेल, तर पचनशक्तीत बिघाड येत नाही. अमेरिकेच्या अन्नविज्ञान तज्ज्ञांनी असे संशोधन केले आहे की, आहारात नियमित टोमॅटोचा वापर असेल तर ते आतडय़ांसाठी लाभदायी आहे. आतडय़ांमधील सुक्ष्मजीवाणूंचे निराकरण करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे, असे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले.

कोलंबस येथील ओहिओ विद्यापीठातील शास्त्रांनी हे संशोधन केले असून ‘मायक्रोबायोलॉजी स्पेक्ट्रम’ या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे. या संशोधकांनी डुकरांवर संशोधन करून हा निष्कर्ष काढला. काही डुकरांच्या पिल्लांना १४ दिवसांसाठी टोमॅटो पूरक आहार देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आतडय़ातील सुक्ष्मजीवाणूंचे निरीक्षण करण्यात आले. आतडय़ातील सुक्ष्मजिवाणूंचे प्रमाण टोमॅटोमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे या संशोधकांनी सांगितले.

टोमॅटोचा वापर आरोग्याच्या विविध सकारात्मक परिणामांशी संबंधित आहे आणि अमेरिकते ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त वापरली जाणारी भाजी आहे. एकूण भाज्यांच्या सेवनापैकी २२ टक्के टोमॅटोचा वापर केला जातो, त्यामुळे आम्हाला या सामान्यत: सेवन केलेल्या अन्नाचे आरोग्यावर होणारे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात रस आहे, असे या संशोधकांचे पथकाचे नेतृत्व करणाऱ्या ओहिओ विद्यापीठाच्या अन्नविज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जेसिका कूपरस्टोन यांनी सांगितले.