Milind Soman : मिलिंद सोमणने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. आज त्याला अतिशय फिट आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाते. मिलिंद सोमणने त्याच्या आयुष्यात अशा सवयी अंगीकारल्या आहेत की, त्या सवयी त्याच्या क्षेत्रातील लोकांना अतिरेक वाटतात. एका जुन्या मुलाखतीत तो सांगतो, “मी चहा किंवा कॉफी पित नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी फळांचा रस घेतो.”
“लहानपणापासूनच मला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय नाही. मला आठवते की मी माझ्या बालपणात कुठेतरी वाचले होते की हे आरोग्यासाठी वाईट आहे. सहसा मॉडेल्स खूप चहा आणि कॉफी पितात, कदाचित दिवसातून १५ ते २० कप चहा आणि कॉफी पितात, ते सिगारेट ओढतात आणि दारू पितात. तणावामुळे काही लोक या सवयींमध्ये अडकतात,” असे मिलिंद सोमण सांगतो.
ग्रीन ज्यूस आणि बायोहॅकिंगच्या युगात सोमणची कॅफिन-मुक्त जीवनशैली अनेक चांगल्या गोष्टी दर्शवते: किती लोक – विशेषतः जास्त दबावाखाली काम करणारे लोक दीर्घकाळाचा विचार न करता चहा कॉफीचे अतिसेवन करतात. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात की, कॅफिन रोजच्या जीवनाचा भाग बनते तेव्हा शरीराबरोबर नेमके काय घडते? आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
दिवसातून १५-२० कप चहा किंवा कॉफी प्यायल्याने काय होते?
डॉ. सिंगला यांच्या मते, कॅफिनचा शरीरावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो. कालांतराने तुम्हाला अस्वस्थता, चिंता, निद्रानाश, पोट खराब होणे किंवा मळमळ आणि उलट्यासुद्धा होऊ शकतात. तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबसुद्धा वाढतो,” असे डॉ. सिंगला सांगतात. “कॅफिन हा लोह शोषून घेण्यास व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे अशक्तपणा आणि शरीरातील इतर पोषक घटक कमी होतात.”
कालांतराने आरोग्याशी संबंधित आणखी धोके वाढतात. हृदय गती आणि रक्तदाब सतत वाढल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित ताण, झोप नीट न होणे, मूड बदलणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि दीर्घकालीन मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कॅफिनमुळे डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसून येतात.
जेव्हा तुम्ही १५-२० कप चहा किंवा कॉफी सेवनाबरोबर धूम्रपान आणि मद्यपान करता, तेव्हा काय होते?
बरेच लोक विशेषत: जे लोक तणावाखाली असतात, ते चहा किंवा कॉफी सेवनाबरोबर धूम्रपान आणि मद्यपान करतात, पण हे कॉकटेल खूप जास्त आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
“धूम्रपान आणि मद्य हे दोन्ही कर्करोगजन्य आहेत. जास्त कॅफिनच्या सेवनाने तुमचे हृदय, यकृत आणि मज्जासंस्थेवर ताण वाढतो,” असे डॉ. सिंगला सांगतात. “कॅफिनच्या सेवनाने शरीर डिहायड्रेट होते, अपुरी झोप आणि चयापचय क्रिया सुरळीत पार पडावी म्हणून यकृतावर ताण पडतो” डॉ. डॉ. सिंगला पुढे सांगतात. तसेच एकूण ताण वाढतो आणि मूड बदलतात. विशेषत: ज्यांचे आधीपासूनच मानसिक आरोग्य खराब असेल किंवा हृदयरोगाशी संबंधित समस्या असेल त्यांना हा त्रास जास्त तीव्रतेने जाणवतो.
कोणाला सर्वात जास्त धोका असतो?
या वाईट सवयीचे परिणाम सर्वांवर समान दिसत नाही, असे डॉ. सिंगला सांगतात. काही लोकांना याचा जास्त त्रास जाणवू शकतो.
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला : जास्त कॅफिन गर्भाच्या विकासावर आणि दुधाच्या उत्पादनावर परिणाम करू शकतात.
मुले आणि किशोरवयीन मुले : तणाव, झोपेच्या समस्या आणि त्यांच्या वागणुकीत बदल होण्याची शक्यता जास्त असते.
हृदयरोग, तणाव किंवा यकृताचे विकार असलेले लोक : या लोकांना या सवयींचा जास्त धोका असतो.
मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात दिसण्यावर अधिक दबाव टाकला जातो, अशा क्षेत्रात वावरताना मिलिंद सोमणने या पदार्थांपेक्षा फळाच्या रसाला आणि बाहेर पार्ट्यांना जाण्यापेक्षा व्यायामाला जास्त प्राधान्य दिले, ज्याचे फळ फक्त त्याच्या फिटनेसमधूनच नाही तर शांत व स्पष्ट स्वभावातून दिसून येते.