गेमिंग, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म्स आणि पोर्नोग्राफी या सगळ्याचा एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे एकलकोंडेपणा. आयसोलेशन. या सगळ्या माध्यमांचा वापर करणारे कुठे ना कुठे एकलकोंडे होत जातात. म्हणजे समाज माध्यमे एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी असली तरी माणसं याच्या अतिवापरामुळे एकलकोंडी होण्याची खूप दाट शक्यता असते. विशेषतः मुलांचं मनोसामाजिक आणि भावनिक स्तरावर प्रचंड नुकसान होऊ शकतं. मुलं निरनिराळ्या माध्यमांवर जे काही बघतात ते काही ती सगळ्यांबरोबर बसून बघत नाहीत. अगदी यूट्युब चॅनल किंवा इन्स्टाग्राम, किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरचे व्हीडीओज बघत असतील तरीही! म्हणजेच ती स्वतःला आयसोलेट करून या माध्यमांवर जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशात काही काळ पॉर्न बघण्यासाठी दिला जात असेल तर तोही एकटेपणामध्येच दिला जातो. या सगळ्यातून दोन गोष्टी घडतात. एकतर वेळेचं भान सुटतं आणि टीनएजर्स एकटी-एकाकी-एकलकोंडी होऊ शकतात.

आणखी वाचा: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळे वाढतोय का?

पालक मोठ्या हौसेने महागडे फोन घेऊन देतात आणि मुलांना नकळत पॉर्नचं/गेमिंगचं/सोशल मीडियाचं विश्व खुलं होतं. आपल्याकडे मुलांवर असणारं प्रेम व्यक्त करण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यात मुलांना अगदी लहान वयापासून स्वतःचे फोन घेऊन देणं हा प्रकार सर्रास दिसून येतो. आपल्या जे मिळालं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे ही भावना अनेक पालकांमध्ये असते. मुलांनी टेक्नोसॅव्ही असायलाच हवं ही गरज मुलांच्या आधी पालकांची असते. तर काही पालक इतर पालकांच्या दबावाखाली येत फोन घेऊन देतात. काही जणांसाठी स्वतःचं स्टेटस दाखवण्याची ती एक पद्धत असते.

विचार करा, वयाच्या दहाव्या आणि बाराव्या वर्षी पॉर्न कन्टेन्ट बघण्याचं, गेमिंगचं व्यसन जर मुलांना लागणार असेल तर त्यांचं भवितव्य कसं असेल? नातेसंबंधांबद्दल ते काय विचार करतील? लैंगिकतेबद्दल निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि समस्यांचं समाधान ते कसं करतील?

आणखी वाचा: Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम किती हवा?

हल्ली अनेक घरातून एक चित्र सहज दिसतं ते म्हणजे घरातले सगळे सदस्य हॉल मध्ये बसलेले असतात आणि जो तो आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला असतो. अगदी नवरा बायकोही एकच सीरिअल बघत असले तरी त्या वेब सीरिअलचे सीझन संपवण्याचा त्यांचा स्पीड वेगवेगळा असतो आणि जो तो आपापल्या फोनमध्ये हे सीजन संपवत असतो. इतका टोकाचा एकलकोंडेपणा कुटुंबांमधून दिसू लागला आहे. हे चूक की बरोबर? खरंतर यातलं काहीच नाही. एरवी कुटुंब म्हणून पुरेसा वेळ मोबाईल न वापरता सगळे एकमेकांसाठी देत असतील तर वेब सीरिअल्स एकत्र न बघितल्याने तसा काहीच फरक पडत नाही. पण एरवीही काही संवाद नाही आणि एकत्र मनोरंजनही नाही अशी जर परिस्थिती असेल तर मात्र ते आख्ख कुटुंबच विचित्र ‘आयसोलेशन’ मध्ये जाऊ शकतं. ज्याचा थेट परिणाम म्हणजे माणसांचा संवाद कमी होत जाणं.

डिजिटल समतोल हवा तो एवढ्याचसाठी. तो नसेल तर कुठे थांबायचे हे समजणे कठीण जाईल आणि फोनमध्ये वेळ घालवण्याच्या नादात माणसं एकेकटी होतील.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children are getting lonely isolated due to addiction hldc psp