अगदी छोट्या मुलांनी चटचट जेवलं पाहिजे, मागे भुणभुण न करता एका जागी बसलं पाहिजे, आपल्या कामात लुडबुड करायला नको म्हणून सहजपणे पालक मुलांच्या हातात फोन देतात आणि हळूहळू मुलांना फोनची सावर लागते याचा विचार कधी आपण केला आहे का? दहाबारा वर्षांखालची बहुतेक मुलं मोबाईल घेऊन काय करतात? तर गेम्स खेळतात आणि त्यावरच्या वयोगटातली मुलं गेम्सबरोबर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक यांवर वावरायला लागतात. जिथे पालकांनाच फोन वापरण्यासंदर्भात, स्क्रीन टाइम संदर्भात कुठलेही नियम, बंधनं नको असतात तिथे मुलांना ती का हवीशी वाटतील? आणि त्यांना नियम किंवा शिस्त लावणार कोण? मुलांपर्यंत काय पोहोचतं, कसं पोहोचतं यावर पालकांना वाटतं तितकं त्यांचं नियंत्रण आज नाही. शिवाय स्मार्टफोनच्या बाबतीत मुलं पालकांचंच अनुकरण करत असतात. आईबाबा स्मार्टफोन कसा वापरतात हे बघून मुलं स्वतःच्या हातातला फोन वापरायला शिकतात. त्यांच्या आजूबाजूचे मोठे फोनचा वापर कसा करतायेत याकडे मुलांचं बारीक लक्ष असतं. मग ते तासनतास व्हॉटसअपवर चॅटिंग करणं असेल नाहीतर बाथरूममध्ये फोन घेऊन जाणं असेल. पालकांच्या इंटरनेटच्या आणि स्मार्टफोन वापराच्या सवयी ज्या आणि जशा आहेत; त्यांचा प्रभाव मुलांवर पडतोच. त्यामुळे या सगळ्याला कसं सामोरं जायचं हा पालकांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकांनी पुढे दिलेल्या पाच मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे. आणखी वाचा: Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम किती हवा? १) इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोन या आधुनिक काळाच्या महत्त्वाच्या क्रांती आहेत. त्या आपल्या जगण्यात शिरलेल्या आहेत, आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत; त्यांना पूर्णतः डिलीट करता येऊ शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना शरण जाऊन, त्यांचे गुलाम व्हावे. मुलांच्या स्क्रीन टाईमची काळजी जर पालकांना वाटत असेल तर आधी त्यांनी स्वतःच्या स्क्रीन टाईमची काळजी करणं आवश्यक आहे. जर त्यांच्या सवयी बदलल्या तर मुलांमध्ये बदल होणं सोपं होऊ शकतं.२) आपण एकदा पालक झालो की जगातले सगळे नियम फक्त आपल्या मुलांसाठी आहेत आणि ते नियम राबवून आपण मुलांना योग्य वळण आणि शिस्त लावतो असा आपला म्हणजे तमाम पालकांचा समज असतो. मोबाईलच्या बाबतीत मुलांसाठी एक नियम आणि पालकांसाठी वेगळे असं होऊ शकत नाही. मुलांना शिस्त लावण्याआधी स्वतःला शिस्त लावली पाहिजे.मुलांना पालकांचा स्क्रीन टाइम हेल्दी दिसला पाहिजे.३) स्क्रीनच्या पलीकडे पालक अनेक गोष्टी करत आहेत, ज्यात फोन सहभागी नाहीये हेही मुलांना दिसले पाहिजे. म्हणजे पालक पुस्तकं वाचत आहेत, व्यायाम करत आहेत, तो करत असताना जवळ फोन नाहीये, हेडफोन्स नाहीयेत, पालक बागकाम करता आहेत, किंवा त्यांचा कुठलाही छंद जोपासता आहेत हे दिसलं पाहिजे. त्यामुळे ऑफलाईन ऍक्टिव्हिटी करण्यातला मुलांचा रस वाढू शकतो. आणखी वाचा: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा दुष्परिणामच अधिक! ४) हॉटेलमध्ये गेल्यावर आईबाबा आणि मुलं आपापल्या फोनमध्ये डोकं खुपसून असतात.. असं कधीही करू नये. आपण बाहेर एकत्र जातो तो वेळ महत्वाचा असतो हे मुलांपर्यंत तेव्हाच पोहोचेल जेव्हा आईबाबा किंवा इतर मोठे फोन बाजूला ठेवून एकमेकांशी आणि मुलांशी गप्पा मारतील. ऑफलाईन गप्पा मारणं ही तितकंच मजेशीर असतं हे मुलांना दिसू द्या.५) खायचे आणि दाखवायचे दात वेगळे नकोत. पालक म्हणून आपण दुतोंडीच असतो, आपल्यात हिपॉक्रसी ठासून भरलेली असते. मुलांनी 'अमुकतमुक' करायचं नाही आणि आपण मात्र तेच 'अमुकतमुक' मुलांसमोर करणार हे नेहमीचंच आहे. आपण मोबाईल वापरतो; तेव्हा तो फक्त कामासाठी असतो आणि मुलं मोबाईल वापरतात; तेव्हा ती टाइमपास करत असतात हे एक ‘असत्य’ आपण पालकांनी स्वतःला सांगितलेलं आहे. स्वतःबरोबर मुलांनाही ते पटवून देण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो… कारण पालक म्हणून ती आपली सोय असते; पण मुलांना दाखवायचे दातही दिसतात आणि खायचे दातही माहीत असतात.६) जे आईबाबा करतात ते आपण केलं; तर त्यात चूक काही असूच शकत नाही असं त्यांना वाटलं आणि ते त्यांच्या वर्तनात दिसायला लागलं; तर दोष मुलांना कसा द्यायचा?७) अनेक पालकांना सकाळी उठल्या-उठल्या आधी मोबाईल बघायची सवय असते किंवा सतत दर पाचदहा मिनिटांनी मोबाईल चेक करण्याची सवय असते. जरा रेंज मिळत नसेल; तर काही पालक अवस्थ होतात. काही पालक सतत सेल्फीज् काढत इंस्टावर अपलोड करत असतात. काही पालक तिथे मिळणाऱ्या लाइक्सना आणि कमेंट्सना बघून खूश होत असतात. त्यांच्या या आनंदी होण्यात व्यत्यय आला तर ते चिडतात. काही पालक ऑफिसमधनं घरी आले की मुलांशी बोलण्याआधी फोनमध्ये डोकं घालतात. काही पालक मुलांना जेवू घालताना त्यांना टीव्ही लावून देतात आणि स्वतः व्हॉट्सॲपमध्ये किंवा सोशल मिडियात डोकं घालून बसतात. काही पालक मुलांना झोपवताना एका हातानं थोपटतात; तर दुसऱ्या हातानं मेसेजेस चेक करत असतात. काही पालक ट्रीपला गेल्यावर प्रवासात बहुतेक सगळा वेळ स्वतःच्या स्मार्टफोनवर काहीबाही बघत असतात. काही पालक सतत कुणाशी तरी गॉसिपिंग करत असतात… यादी अजूनही बरीच मोठी निघेल. हे सगळं मुलांसमोर चालू असतं. मुलं ते बघत असतात. त्यांना जे-जे आणि जितकं समजतंय; त्यानुसार ती त्या सवयी उचलत असतात. त्यामुळे मुलांच्या फोनची काळजी करण्याआधी मोठ्यांनी स्वतःच्या फोनची काळजी केलेली बरी!