Hepatitis Prevention And Treatment : आज जगभरात जागतिक हेपॅटायटिस दिन (२८ जुलै २०२५) साजरा केला जातोय. लोकांना हेपॅटायटिससारख्या गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी सुमारे ११ लाख लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. हेपॅटायटिसमुळे यकृतामध्ये तीव्र जळजळ जाणवते. विषाणू संसर्ग, अल्कोहोल, विषारी पदार्थ किंवा काही औषधांमुळे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे यकृत निकामी होणे किंवा यकृताच्या कर्करोगासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे यकृतामध्ये दिसणारी लक्षणे वेळेवर ओळखणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
हेपॅटायटिस म्हणजे यकृतामध्ये जळजळ जाणवणे. हे लक्षण विषाणू, जीवाणू किंवा इतर कारणांमुळे उदभवू शकते. हेपॅटायटिस हा मुख्यतः विषाणूंमुळे होतो, ज्यामध्ये हेपॅटायटिस ए, बी, सी, डी व ई यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) ‘एलिमिनेट हेपॅटायटिस’ या अहवालानुसार २०१५ मध्ये जगभरात सुमारे ३२५ दशलक्ष लोकांना हेपॅटायटिसची लागण झाली होती. त्यापैकी २५७ दशलक्ष लोक हेपॅटायटिस बीने ग्रस्त होते आणि सुमारे ७१ दशलक्ष लोक हेपॅटायटिस सीने ग्रस्त होते. हे आकडे या आजाराची तीव्रता दर्शवतात.
हिपॅटायटीसची प्रमुख लक्षणे
१) भूक कमी होणे किंवा अजिबात भूक न लागणे
२) डोळे आणि त्वचा पिवळी पडणे
३) मूत्राचा रंग गडद पिवळा दिसणे
४) सतत थकवा आणि डोकेदुखी
५) पोटदुखी, पेटके येणे किंवा उलट्या झाल्यासारखे वाटणे
६) शरीरावर किंवा पायांवर सूज येणे.
७) अचानक वजन कमी होणे
८) डोळ्यांखाली फिकटपणा किंवा थकवा
हिपॅटायटीसवर काही घरगुती उपचार
१) आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. पालक, मेथी, ब्रोकोली, दुधी भोपळा, भोपळा व भेंडी यांचा आहारात समावेश करा.
२) जर तुम्हाला यकृत चांगल्या स्थितीत ठेवायचे असेल, तर दररोज २०० ते ३०० ग्रॅम ब्लॅकबेरी खा.
३) भुई आवळा, घेटुळी व मकोय यांचा रस प्या. या औषधी वनस्पतींचा रस यकृताची जळजळ कमी करण्यास आणि यकृतामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.
४) रिकाम्या पोटी लिंबूपाणी किंवा संत्र्याचा रस प्या. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली ही फळे यकृताला विषमुक्त करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात.
५) लसूण खा. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले लसूण यकृताला विषमुक्त करते आणि यकृतामध्ये जमा होणारी चरबी नियंत्रित करते.
६) ग्रीन टी प्या, त्यात कॅटेचिन असते, जे यकृताचे कार्य सुधारते आणि जळजळ कमी करता येते.
७) स्वच्छतेची काळजी घ्या. साबण आणि पाण्याने नियमितपणे हात धुवा.
८) हेपॅटायटिस ए आणि बीसाठी लसी उपलब्ध आहेत. लसीकरण करून घ्या.
९) संक्रमित व्यक्तीशी संपर्क टाळा.
१०) दूषित अन्न आणि दूषित पाणी पिणे टाळा.