Heart Attack Tablet: कोलेस्ट्रॉल हे आजच्या नव्या पिढीत झपाट्याने वाढणारं एक आजारपण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात – एक LDL कोलेस्ट्रॉल, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि जो हृदयासाठी धोकादायक असतो. दुसरा प्रकार HDL कोलेस्ट्रॉल असतो, जो शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. हा चांगला कोलेस्ट्रॉल हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतो. वाईट कोलेस्ट्रॉलवर वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर ते हृदयविकाराचे कारण ठरू शकते. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी स्टॅटिन नावाची औषधं वापरली जातात.

स्टॅटिन हे असं औषधं आहे जे यकृतात (लिव्हरमध्ये) तयार होणाऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करून रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं. आता शास्त्रज्ञांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी एक नवीन औषध तयार केलं आहे, जे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत करू शकते.

खूप लोकांमध्ये स्टॅटिन (Statins) घेतल्यानंतरही वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल – Low-Density Lipoprotein) कमी होत नाही. स्टॅटिन औषध लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होणं कमी करून शरीरातील त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवतं, पण काही रुग्णांमध्ये त्यांचा परिणाम मर्यादित असतो. आता नवीन प्रयोगात्मक गोळी (Experimental Pill) वर झालेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये दिसून आलं आहे की, ही गोळी स्टॅटिनसोबत दिली असता कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी झालं.

हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?

रक्तात एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असल्यास, तो धमन्यांमध्ये प्लाक (चिकट थर) तयार करतो. हा प्लाक हळूहळू रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो. नवीन एनलिसिटाइड (Enlicitide) नावाची गोळी लिव्हरमधील PCSK9 नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करते. हे प्रोटीन ब्लॉक झाल्यावर वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण झपाट्याने कमी होतं.

पूर्वी इंजेक्शनने उपचार केले जात होते, आता गोळ्यांमुळे काम सोपे होईल

मॅक्स हेल्थकेअरचे चेअरमन डॉ. बलबीर सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी PCSK9 inhibitors जसे की Evolocumab हे इंजेक्शनच्या रूपात वापरले जात होते आणि ते भारतातही उपलब्ध आहेत. हे इंजेक्शन दर दोन आठवड्यांनी किंवा महिन्यातून एकदा दिले जाते आणि ते एलडीएल कोलेस्ट्रॉल ७०% पर्यंत कमी करण्यास सक्षम असते. जर इंजेक्शनइतकाच परिणाम एखाद्या गोळीच्या (daily pill) रूपात मिळाला, तर ते रुग्णांसाठी अधिक सोयीस्कर आणि सोपं ठरेल. इंजेक्शनच्या जागी गोळी उपलब्ध झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, पण आपल्याला हेही पाहावं लागेल की या गोळीमुळे हार्ट अटॅकचा धोका तितक्याच वेगाने कमी होतो का.

संशोधनात किती आश्चर्यकारक निकाल सापडले

फेज-३ क्लिनिकल चाचणीत २,९१२ प्रौढ लोकांना सहभागी करण्यात आलं, ज्यांचे सरासरी वय ६३ वर्ष होतं. हे संशोधन १४ देशांमध्ये ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२५ या काळात करण्यात आलं. अभ्यासानुसार, ज्यांनी एनलिसिटाइड ही गोळी त्यांच्या नेहमीच्या स्टॅटिन औषधांसोबत घेतली, त्यांचा एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर २४ आठवड्यांत ६०% पर्यंत कमी झाला. ज्यांनी फक्त प्लेसबो (placebo) घेतलं, त्यांच्यात असा बदल दिसला नाही. या संशोधनाचे निकाल अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) च्या वैज्ञानिक सत्रांमध्ये सादर करण्यात आले. Merck ही औषध कंपनी पुढील वर्षी FDA (यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) कडे मंजुरीसाठी अर्ज करण्याची योजना आखत आहे.

भविष्यात PCSK9 गोळ्या स्वतंत्रपणे म्हणजेच एकट्याच घेता येतील का?

स्पर्श हॉस्पिटल, बेंगळुरू येथील लीड कार्डिओलॉजिस्ट डॉ. रंजन शेट्टी सांगतात की, स्टॅटिन औषधं साधारणपणे ४०% पर्यंत एलडीएल कमी करतात, पण काही रुग्णांमध्ये ते पुरेसं नसतं. अनेक रुग्णांना हायपरकोलेस्ट्रोलेमिया नावाची आनुवंशिक (जन्मजात) आजार असतो, ज्यात कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढतो. अशा परिस्थितीत फक्त स्टॅटिन औषधं पुरेशी ठरत नाहीत. काही इतर औषधं किंवा सप्लिमेंट्सही त्यांचा परिणाम कमी करतात.

नवीन गोळी स्टॅटिनच्या जागी वापरता येईल का?

डॉ. बलबीर सिंह सांगतात की, नवी औषधं स्टॅटिनच्या जागी वापरता येणार नाही. ती स्टॅटिनसोबतच घ्यावी लागतील, कारण मुख्य काम स्टॅटिनचं असतं. मात्र, इंजेक्शनच्या तुलनेत गोळी कमी खर्चिक आणि अधिक सोयीची असेल.