Heart Attack Symptoms: गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. हे आजारपण तरुणांमध्येही वाढताना दिसते आहे. चुकीचे खाणे, धूम्रपान, ताण, झोपेची कमी आणि व्यायाम न करणे हे याचे मोठे कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे १.८ कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो. त्यात मोठा भाग हार्ट अटॅकमुळे होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर रुग्णांना “गोल्डन अवर” म्हणजेच पहिल्या एका तासात योग्य उपचार मिळाले, तर हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात.

हार्ट अटॅक तेव्हा येतो, जेव्हा हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्ताचा प्रवाह अचानक थांबतो किंवा खूप कमी होतो. हा अडथळा धमनीत साठलेली चरबी, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम यांसारख्या थरांमुळे होतो. जेव्हा हे थर कडक होऊन रक्ताचा प्रवाह अडवतात, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हृदयाच्या काही भागाचे नुकसान होऊ शकते.

WebMD नुसार, हार्ट अटॅक येण्याआधी दिसणारे सामान्य लक्षण म्हणजे छातीत दाब किंवा वेदना होणे, जे खांदा, जबडा किंवा हातापर्यंत पसरू शकते. Healthline नुसार, हार्ट अटॅक येण्याच्या सुमारे एक महिना आधीच शरीर हार्ट अटॅकचे लक्षणे दर्शवू लागते. चला तर मग पाहूया हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात.

छातीत वेदना किंवा दाब जाणवणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी सर्वसामान्य लक्षण म्हणजेछातीत त्रास जाणवणे.(छातीत दुखणे / छाती भरून येणे) हे दाब, ताण किंवा जळजळसारखे वाटू शकते. अनेकदा लोक याला हार्टबर्न समजतात, पण वेदना खांदा, गळा, जबडा आणि हातांपर्यंतही पसरू शकते. हे तेव्हा होते, जेव्हा हृदयाला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही आणि धमन्या अरुंद होतात. ही वेदना कधी विश्रांतीत, कधी मेहनत किंवा ताणातही होऊ शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.

कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणे

जर सतत थकवा जाणवत असेल आणि आराम केल्यानंतरही कमजोरी निघून जात नसेल, तर हे हृदयाच्या समस्या दर्शवू शकते. असे तेव्हा होते, जेव्हा हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करू शकत नाही आणि शरीरातील अवयव आणि स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही. सततचा थकव्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.

श्वास घेण्यास त्रास होणे

चालणे किंवा जिन्यावर चढणे अशा थोड्याशा हालचालींमध्ये जर श्वास फुलायला लागला, तर हे हृदयाच्या समस्या दर्शवू शकते. जेव्हा हृदय कमजोर होते, तेव्हा फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. हे लक्षण छातीत दाबासह आले तर अजून गंभीर ठरू शकते.

चक्कर येणे

जेव्हा हृदयाचे रक्त पंप करण्याचे सामर्थ्य कमी होते, तेव्हा शरीर आणि मेंदूकडे पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे रुग्णाला वारंवार चक्कर येणे, हलकं वाटणे किंवा डोकेदुखी/भोवळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. अचानक उभं राहणं, बसणं किंवा शरीराची स्थिती बदलल्यास हे लक्षण वाढू शकते. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनियमित हृदयाचा ठोका

हृदयाचा ठोका खूप वेगवान, खूप मंद किंवा अनियमित होणेही हार्ट अटॅक होण्यापूर्वीचे लक्षण असू शकते. अनेकदा अशावेळी अनेकांना आपण घाबरलोय की काय असे वाटते, पण प्रत्यक्षात हे हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये गडबड असल्याचे चिन्ह आहे. ठोका जाणवल्याबरोबर छातीत वेदना, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवली तर हे धोक्याचे लक्षण आहे.