Heart Attack Symptoms: हृदयाचा आजार फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात झपाट्यानं वाढत आहे. भारतात हृदयाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. भारतात दर १० सेकंदांनी हृदयाच्या रुग्णाचा मृत्यू होतो.
दरवर्षी हजारो लोकांचे प्राण या आजारामुळे जातात. पण, सुरुवातीची लक्षणे साधी समजून अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणे वेळेवर ओळखून लगेच उपचार सुरू केले, तर जीव वाचवता येऊ शकतो. कारण- हृदयाच्या आजारात फक्त हृदयातच वेदना होत नाहीत, तर शरीरात आणखी बरेच बदल जाणवतात.
अपोलो हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ए. श्रीनिवास कुमार यांच्या मते, हार्ट अटॅक अचानक येत नाही. त्यापूर्वी शरीर काही सावध करणारी चिन्हे दाखवते. ही चिन्हे ओळखून वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. दरवर्षी तरुण आणि वयोवृद्ध अशा दोघांमध्येही हार्ट अटॅकची हजारो प्रकरणे दिसतात. त्यामुळे जागरूकता खूप आवश्यक आहे आणि काळजी घेतली, तर या धोक्यापासून वाचता येऊ शकते.
छातीत अस्वस्थता किंवा वेदना
हार्ट अटॅकचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे छातीवर दाब, छातीत जळजळ किंवा जडपणा जाणवणे. हा त्रास काही मिनिटे सतत राहू शकतो किंवा मधे-मधे येऊन जाऊ शकतो. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. असे वारंवार होत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
छातीतील वेदना बाहेर पसरणे
हार्ट अटॅकचा त्रास फक्त छातीपुरता मर्यादित राहत नाही. तो डावा हात, खांदा, पाठ, मान, जबडा व वरच्या पोटापर्यंत पसरू शकतो. असा त्रास छातीतील अस्वस्थतेसोबत जाणवला, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका पोहोचू शकतो.
श्वास घेण्यात अडचण
कसलाही श्रम न करता धाप लागणे हे हार्ट अटॅकचे गंभीर लक्षण असू शकते. छातीत वेदना नसतानाही ही समस्या दिसू शकते. याचा अर्थ हृदय नीटपणे रक्त पंप करू शकत नाही.
थंड घाम येणे
अचानक काही कारण नसताना थंड घाम येऊ लागणे आणि त्यासोबत अस्वस्थता जाणवणे हे हृदयाच्या त्रासाचे लक्षण असू शकते. हे लक्षण शरीरातील रक्तप्रवाहातील अडथळा आणि हृदयावर येणारा ताण यांमुळे होते.
मळमळ, अपचन किंवा पोटात अस्वस्थता
बर्याचदा लोक मळमळ, उलटी किंवा गॅसची समस्या ही फक्त पोटाची तक्रार समजून दुर्लक्ष करतात. पण, ही लक्षणे विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची चिन्हे असू शकतात. अपचनासोबत छातीत जडपणा किंवा थकवा जाणवला, तर सावध राहून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
अचानक चक्कर येणे, डोके गरगरणे किंवा बेशुद्ध पडणे हे हृदयाच्या गंभीर त्रासाचे लक्षण असू शकते. असे तेव्हा होते जेव्हा हृदय नीट रक्त पंप करू शकत नाही आणि मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही.
जबडा, मान किंवा खांद्यात वेदना
बहुतेक लोकांना वाटते की, हार्ट अटॅकमध्ये फक्त छातीतच वेदना होतात. पण, खरे तर हृदयाच्या त्रासाची वेदना जबडा, मान, पाठ किंवा खांद्यापर्यंत पसरू शकते. अशी वेगळी लक्षणे अनेकदा हार्ट अटॅक ओळखायला उशीर करतात.