Modern Science And Ayurveda Benefits For Health : आयुर्वेदाने काही पदार्थांची दीर्घायुष्याचा पाया म्हणून निवड केली आहे. त्यामध्ये दूध, तूप, फळे, काजू, या पदार्थांचा समावेश आहे. प्राचीन उपचार आणि आजच्या पोषण तक्त्यामध्ये त्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. कारण – हे पदार्थ मनाची एकाग्रता वाढवून तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवू शकतात. आता आधुनिक विज्ञानदेखील सांगते की, हे पदार्थ तुमच्या शरीराचे रक्षण करू शकतात. तर हे सगळेच पदार्थ तुमच्या आरोग्याशी कसे फायदेशीर ठरतात याबद्दलच या बातमीतून जाणून घेऊया…
१. दूध
आयुर्वेदानुसार दूध हे शरीराची ताकद, रोगप्रतिकार शक्ती आणि उत्साह टिकवणारी शक्ती शरीराला पुरवते. गाईचे दूध उकळून घ्या आणि वेलची किंवा हळदीसह त्याचे सेवन करा. त्यामुळे वात आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत होते आणि चांगली झोप लागते.
आधुनिक विज्ञानानुसार कॅल्शियम, प्रथिने आणि बी जीवनसत्त्वाने समृद्ध असलेले दूध हाडांची ताकद, स्नायूंची दुरुस्ती व मज्जासंस्थेच्या आरोग्यास मदत करते. रात्री कोमट दूध प्यायल्याने मेलाटोनिन सुधारते आणि तुम्हाला चांगली झोप लागते.
२. बटर
आयुर्वेदानुसार ताजे बटर पित्त नियंत्रित करण्यासाठी शरीराला थंडावा देते, पचनसंस्थेला वंगण घालते आणि सांधे लवचिकता व मानसिक स्थिरतेस मदत करते.
आधुनिक विज्ञानानुसार बटरमध्ये फॅट विरघळणारी अ, ड, ई व के अशी जीवनसत्त्वे असतात, जी हार्मोनल आरोग्य आणि पोषक घटकांच्या शोषणासाठी महत्त्वाची असतात. काही बटरमध्ये संयुग्मित लिनोलिक ॲसिड (सीएलए) असते, जे हृदय आणि चयापचयावर चांगला परिणाम करतात.
३. फळ
आयुर्वेदानुसार आंबा, केळी, द्राक्षे व डाळिंब यांसारखी गोड, पिकलेली फळे सात्त्विक असतात. ही फळे शरीराला हलकेपणा देऊन ताजेपणा वाढवतात. शरीर स्वच्छ करतात आणि वात, पित्त संतुलित ठेवतात.
आधुनिक विज्ञानानुसार अँटीऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स व फायबरने भरलेली फळे आतड्यांचे आरोग्य सुधारतात, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
४. सुका मेवा
आयुर्वेदानुसार बदाम, अक्रोड व काजू हे सुक्या मेव्यातील पदार्थ बलवर्धक (बलवर्धक म्हणजे बळ, शरीराची ताकद वाढवणारे पदार्थ) आहेत. रात्रभर बदाम भिजवून आणि सोलून, त्यांचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते आणि वाढते.
आधुनिक विज्ञानानुसार सुका मेवा चरबी, वनस्पती प्रथिने, मॅग्नेशियम व ओमेगा-३ फॅटी ॲसिड शरीराला पुरवतात; जे हृदयाचे आरोग्य, संज्ञानात्मक कामगिरी व स्थिर ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असतात.
रात्री गरम हळदीचे दूध असो, सकाळी भिजवलेले बदाम असो किंवा नाश्त्याला ताजी हंगामी फळे खाणे असो हे चार पदार्थ सिद्ध करतात की, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान तुमच्या आरोग्याचे रक्षण करू शकतात आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवू शकतात.