पुदीना ही स्वयंपाकघरातील एक औषधी वनस्पती आहे. शरीराच्या विविध तक्रारींसाठी पुदीना अतिषय उपयुक्त असतो. मात्र शरीराच्या बाह्य तक्रारींसाठीही त्याचा तितकाच उपयोग होतो. याबाबत आपल्याकडे अनेकांना माहिती नसते. बाजारातील उत्पादनांपेक्षा पुदीना त्वचा आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी कित्येक पटीने फायदेशीर असतो. पुदीना नैसर्गिक क्लिन्झर, मॉईश्चरायझर, शाम्पू आणि कंडिशनर इतकेच नाही तर लीप बाम म्हणूनही काम करतो. पाहूया पुदीन्याचे त्वचा आणि केसांना होणारे नेमके फायदे…
त्वचेवरील रंध्रे बंद कऱण्यास उपयुक्त
पुदीन्यात जास्त प्रमाणात फॉस्फरस, व्हिटॅमिन सी आणि लोह असते. त्याचा चेहऱ्याला फायदा होतो. अनेकांना कमी वयात त्वचेला सुरकुत्या पडतात मात्र पुदीन्यामुळे या सुरकुत्या लवकर पडत नाहीत. यासाठी पुदीन्याची काही पाने बारीक वाटून घेऊन त्यात मध टाका. या दोन्हीचे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
पुरळांवर उत्तम उपाय
तारुण्यात किंवा त्यानंतरही अनेकांच्या चेहऱ्यावर पुरळ येतात. पुरळ येण्याची अनेक कारणे असतात. चेहऱ्यावरील हे पुरळ घालवण्यासाठी पुदीना अतिशय उत्तम उपाय आहे. पुरळ घालविण्याच्या मलम किंवा क्रिममध्येही काहीप्रमाणात मिंट असते. त्याचा त्वचेसाठी चांगला उपयोग होतो. बारीक केलेल्या पुदीन्याच्या पानांमध्ये गुलाबपाणी घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावल्यास त्याचा फायदा होतो.
केसातील कोंड्यासाठी फायदेशीर
कोंड्याची समस्या ही अनेकांना त्रास देणारी समस्य़ा असते. यावर उपाय म्हणून विविध कंपन्यांचे शाम्पू आणि कंडिशनर वापरले जातात. परंतु पुदीन्याचाही यावर चांगला उपयोग होतो. केसांतील मृत त्वचा (स्काल्प) पूर्ववत होण्यास पुदीन्याचा उपयोग होतो.
उवांवर उपयुक्त उपाय
डोक्यात उवा झाल्या असतील तर त्यांच्यावर उपाय म्हणून पुदीना उपयुक्त असतो. यासाठी पुदीन्याचे तेल आठवड्यातून तीन ते चार वेळा लावावे. या तेलाचा वास उग्र असतो. त्यामुळे डोक्यातील उवा जाण्यास मदत होते. उवांवर उपयुक्त अशा अनेक औषधांमध्ये पुदीना असतो.