Parenting Mistakes : लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना लहान वयात आपण ज्या प्रकारे आकार देऊ तशी ती घडतात. त्यामुळे पालकांचे प्रत्येक वर्तन, प्रत्येक शब्द, सवय या गोष्टींचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. विशेषत: आईच्या प्रत्येक वर्तनाचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वार परिणाम होत असतो. बऱ्याचदा आई जाणूनबुजून किंवा नकळतपणे लहान वयात मुलाच्या छोट्या छोट्या गोष्टी किंना सवयींकडे दुर्लक्ष करते. पण, मुलांच्या या सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमुळे पुढे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते.
आईसमोर एखादी चूक पुन्हा पुन्हा केली आणि त्यानंतरही ती त्याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर मुलाचा गैरसमज होतो. त्याला वाटतं की, आईचं आपल्याकडे काही लक्ष नाही आणि आपण तीच चूक पुन्हा करु शकतो. तीच बाब खोट बोलण्याच्या बाबतीतही आहे. पण, याच गोष्टी पुढे मुलाच्या भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. पण, आईच्या अशा कोणत्या चुका आहेत, ज्यामुळे मुलं खोट बोलण्यास शिकतात ते जाणून घेऊ…
१) मुलांना काही खोटं सांगणं
बऱ्याचदा आई आपल्या मुलांचं मनोरंजन करण्यासाठी किंवा त्याला काहीतरी पटवून देण्यासाठी खोटं बोलते. उदा. जर तू टीव्ही बंद केलास, तर आपण बाहेर फिरायला जाऊ; पण बाहेर काही ती घेऊन जात नाही. असं खोटं बोलणं मुलाच्या मनात खोलवर रुजतं. त्याला वाटू लागतं की, खोटं बोलणं हे एखाद्याचं लक्ष विचलित करण्याचा किंवा काम पूर्ण करून घेण्याचा एक मार्ग आहे. मग हळूहळू मुलंदेखील त्या मार्गावर चालायला लागतात.
२) इतरांसमोर मुलाला वाईट बोलणं
जर आई इतरांसमोर आपल्या मुलांबद्दल वाईट बोलत राहिली, तर त्याचाही मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. उदा. आई इतरांसमोर म्हणत असेल की, माझं मूल फार हट्टी आहे किंवा माझं ऐकत नाही. तर अशा गोष्टींमुळे मुलाला लाज वाटू लागते. त्यामुळे अनेकदा मुलं आईपासून आपल्या चुका लपवण्यासाठी खोटू बोलू लागतात आणि नंतर हळूहळू त्या गोष्टींचं रूपांतर सवयीत होतं.
३) आई स्वत: खोटं बोलते तेव्हा
सुरुवातीला मुलं बहुतेक वेळ त्यांच्या आईबरोबर असतात. त्यामुळे आईच्या सवयींचा परिणाम मुलांवर होणं स्वाभाविक आहे. जर अनेकदा आई नातेवाईक, शेजारी किंवा कुटुंबातील सदस्य यांच्याशी खोट बोलत असेल, तर मुलंही खोटं बोलू लागतात. अशा प्रकारे मुलांना आईकडून लहान वयात खोटं बोलण्याची सवय लागते.
४) मुलांना नेहमी शिव्या देणं किंवा घाबरवणं
जेव्हा मुलांना घरी खूप घाबरवलं जातं किंवा प्रत्येक लहान-मोठ्या चुकीसाठी ओरडलं जातं, तेव्हा अशा परिस्थितीत मुलं खोटं बोलायला शिकतात. अगदी लहानशा चुकीसाठी मोठी शिक्षा दिला जाते तेव्हा पुढच्या वेळी ती चुक झाल्यानंतर आपल्याला फटकारलं जाईल या भीतीनंही आपली चूक लपवण्यासाठी मुलं खोटं बोलतात. त्यातून मुलांना खोट बोलण्याची सवय लागते.
५) इतरांशी तुलना
जेव्हा आई सतत आपल्या मुलाची तुलना इतरांशी करू लागते. जसे की, तो तुझ्या वर्गातला रोहन बघ अभ्यासात किती हुशार आहे, नेहमी पहिला नंबर काढतो. त्याच्याकडून काहीतरी शिक. अशा प्रकारे आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना केल्यामुळे मुलांचा स्वाभिमान दुखावतो. मग ती मुलं आईसमोर स्वत:ला उत्तम सिद्ध करण्यासाठी किंवा तिची प्रशंसा ऐकण्यास त्यांचे कान आतुर झालेले असल्यामुळे अनेकदा खोटं बोलू लागतात. मग याच गोष्टींचं हळूहळू त्यांच्या सवयीत रूपांतर होतं.