How to Clean a Mop : घरात रोजच्या रोज स्वच्छता करताना लादी पोछाचा (मॉपचा) सर्वाधिक वापर होतो. किचनपासून ते हॉलपर्यंत आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणारा हा मॉप गृहिणींना स्वच्छता कामातील मदतीसाठी एक महत्त्वपूर्ण साथीदार ठरतो. मात्र, वारंवार केल्या जाणाऱ्या त्याच्या वापरामुळे त्यावर धूळ, तेलकटपणा आणि बारीक बारीक कचरा चिकटतो. काही दिवसांनी हा मॉप इतका घाणेरडा दिसू लागतो की, त्याद्वारे लादी स्वच्छ होण्याऐवजी तो अजून जास्त डाग आणि मळ पसरवण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे घरात पुन्हा अस्वच्छतेसोबतच एक विचित्र वासही पसरतो. अनेकदा घरातील स्त्रिया किंवा गृहिणी मॉपने फारशी स्वच्छता होत नसेल, तर तो सरळ फेकून देणेच योग्य समजतात. पण खरं सांगायचं झालं, तर मॉप फेकून देण्याऐवजी तो योग्य पद्धतीने स्वच्छ केला, तर पुन्हा तो अगदी नव्यासारखा वापरता येतो.

आज आपण मॉपला स्वच्छ करणाऱ्या अशाच काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या टिप्स पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनची गरज लागणार नाही किंवा मॉप घासूनही स्वच्छ करावा लागणार नाही. अगदी काही साध्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचा मॉप पुन्हा एकदम चमकदार बनवू शकता.

पद्धत १ : पॉलिथीनमध्ये मॉप स्वच्छ करण्याची खास ट्रिक

सर्वप्रथम एक मजबूत पॉलिथीन पिशवी घ्या. त्यात एक वाटी मीठ आणि दोन चमचे बेकिंग सोडा टाका. त्यानंतर त्यात थोडाेसे बाथरूम क्लीनर आणि काही थेंब डेटॉल घाला. आता यात पुरेसं पाणी मिसळा आणि ते द्रावण चांगलं हलवा. या मिश्रणात तुमचा घाणेरडा मॉप टाका. मॉपच्या हँडलसकट पिशवी नीट बांधून घ्या. आता पिशवीला हाताने हलक्या हाताने थापटून घ्या किंवा जमिनीवर थोडं आपटून घ्या. असे केल्याने मॉपमध्ये अडकलेली घाण, धूळ आणि चिकटपणा हळूहळू निघून जाईल. १५-२० मिनिटांनी पिशवी उघडून मॉप स्वच्छ पाण्याने धुवा. मग बघा तुमचा मॉप एकदम स्वच्छ आणि जंतूमुक्त झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

पद्धत २: व्हिनेगर आणि ब्लीचचं मिश्रण

मॉप स्वच्छ करण्याचा अजून एक उत्तम उपाय म्हणजे घरच्या घरी घोल तयार करणे. एका बादलीत कोमट पाणी घ्या. त्यात एक कप पांढरे व्हिनेगर मिसळा. त्यानंतर त्यात थोडेसे ब्लीच टाका. या मिश्रणात तुमचा मॉप १५ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. व्हिनेगरमुळे मॉपवरील डाग आणि वास निघून जातो; तर ब्लीचमुळे जंतूंचा नाश होतो. १५ मिनिटांनी मॉप बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवा आणि उन्हात वाळत ठेवा. उन्हात वाळवल्याने मॉप पूर्ण कोरडा होतो आणि त्यावरील दुर्गंधीही नाहीशी होते.

नियमित काळजी का आवश्यक?

मॉप हा रोजच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी मॉप नीट धुणे आणि उन्हात वाळवणे खूप गरजेचे आहे. मॉप धुतला न गेल्यास मॉपवर जीवाणू, बुरशी आणि धूळ जास्त प्रमाणात साचते. त्यामुळे घरात आजारपण पसरू शकते. त्याशिवाय मॉपला येणारा वास घरात दुर्गंधी पसरवतो आणि वातावरणाला दूषित करतो.