Best Food For Joint Pain : बहुतेक लोकांना असं वाटतं की, सांध्यांची काळजी जेव्हा आपल्याला वेदना होतात तेव्हा घ्यायला हवी. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तुमचे सांधे तुम्ही वयाच्या ४० वर्षांपर्यंत पोहोचण्याआधीच अनेक वर्षांचा ताण, चुकीची बसण्याची व उभी राहण्याची सवय (पोश्चर) आणि पोषणाची कमतरता सहन करत असते. हेच सांधे तुम्हाला कामाच्या दिवसांत, व्यायामात आणि सुट्टीच्या दिवसांत साथ देतात. पण अनेकदा त्यांना योग्य ती काळजी मिळत नाही.
तर indiatvnews.com ने सांध्यांचे संरक्षण करण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, सल्लागार डॉक्टर चंद्रशेखर दीक्षित यांच्याशी संपर्क साधला; तेव्हा त्यांनी सांगितले की, सांधे दुखणे आता वयोवृद्धानपर्यंत मर्यादित राहिलेले नसून २० आणि ३० वयोगटालातील लोकांमध्येही सांध्यांमध्ये झीज आणि कडकपणाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी योग्य अन्न आणि व्यायामाने तुमचे सांधे मजबूत आणि सुरक्षित ठेवा.
डॉक्टर दीक्षित म्हणतात की, तुमचा आहार सांध्याच्या आरोग्याबाबत खूप मोठी भूमिका बजावतो. तुम्ही खाल्लेले पदार्थ तुमच्या कूर्चाचे (कार्टिलेज) एकतर रक्षण करतात किंवा त्यांना हानी पोहचवू शकतात.
१. ओमेगा-३ पदार्थ – सॅल्मन, जवस, अक्रोड आणि चिया सीड्स यांचा आहारात समावेश करा; जे सांध्यातील जळजळ, कडकपणा कमी करण्यास मदत करतात.
२. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी – मजबूत हाडांसाठी, दूध, दही, टोफू (tofu), पालेभाज्या खा. सकाळी उन्हात बाहेर पडा; जेणेकरून तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होईल; जे कॅल्शियम शोषण्यासाठी महत्वाचे असते.
३. कोलेजनयुक्त पदार्थ – संत्री, बेरी, शिमला मिरची, आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी असते; जे कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. प्रथिने कूर्चाची (कार्टिलेज) लवचिकता आणि सांध्यांना बळकट ठेवण्यास मदत करतात.
४. सांध्यांना हानी पोहचवणारे अन्न टाळा – रिफाइंड साखर, तळलेले स्नॅक्स, प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन कमी करा; यामुळे जळजळ वाढते, कार्टिलेजची झीज वाढते. त्यामुळे सर्वात निरोगी गुडघे देखील जंक-फूड जीवनशैलीत टिकू शकत नाहीत; असा इशारा डॉक्टर दीक्षित देतात.
५. व्यायाम करा – जास्त ताण देणारे (हाय-इम्पॅक्ट) व्यायाम कालांतराने सांध्यांना नुकसान पोहोचवू शकतात. पण, जास्त ताण न देणारे (लो-इम्पॅक्ट) सांध्यांना व्यायाम दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात; असे डॉक्टर दीक्षित म्हणतात.
याव्यतिरिक्त
पोहणे – स्नायूंना बळकटी देताना सांध्यावरील दाब कमी करते.
सायकलिंग – गुडघ्यांची लवचिकता आणि सहनशक्ती वाढवते.
जलद चालणे – गुडघ्यांवर जास्त भार न टाकता रक्ताभिसरण वाढवते.
योगा आणि स्ट्रेचिंग – शरीराची स्थिती आणि संतुलन राखण्यास मदत करते.
आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने सांध्याभोवती असणाऱ्या स्नायूंचा आधार वाढण्यास मदत होते; ज्यामुळे दैनंदिन ताण कमी होतो. जर तुमच्या कामात बराच वेळ बसणे समाविष्ट असेल; तर दर ३० मिनिटांनी उभे राहा, स्ट्रेच करा आणि लहान ब्रेक घ्या. सांध्यांचे त्रास एका रात्रीत सुरु होत नाही तर हळूहळू, शांतपणे वाढत जातो. त्यामुळे शरीराला योग्य पोषण द्या आणि नियमित हालचाल ठेवा.आतापासून तुम्ही तुमच्या सांध्यांची काळजी घेतलीत तर तुमचे सांधे तुम्हाला ६० वर्षांनंतरही सहज साथ देतील.