How To Check Quality Of Dry Fruits : सणांच्या काळात एखादी गोड बातमी असेल किंवा नातेवाईक, मित्र वा सहकाऱ्यांना मिठाईऐवजी आरोग्यदायी सुका मेवा आपण भेट म्हणून देणे पसंत करतो. वेगवेगळ्या आकारांत पॅकिंग केलेला सुका मेवा आकर्षक दिसतो आणि आरोग्यासाठीही तो फायदेशीर असतो. पण, तुम्ही विकत घेत असलेला सुका मेवा बनावट तर नाही ना. म्हणून सुका मेवा खरेदी करण्याचा विचार करीत असाल किंवा सणाच्या वेळी तुम्हाला भेट म्हणून सुका मेवा मिळाला असेल, तर ते काजू-बदाम खरे आहेत की बनावट हे ठरवण्यासाठी तुम्ही पुढील सोपी पद्धत वापरून पाहू शकता.
बनावट काजू खाल्ल्याने काय होते?
बनावट काजूचे दीर्घकाळ सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या उदभवू शकतात. त्यामुळे पोटात जळजळ किंवा आम्लता होऊ शकते. त्याशिवाय त्यांच्या उत्पादनात वापरले जाणारे कृत्रिम रंगदेखील तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे त्वचेची ॲलर्जी किंवा खाज येऊ शकते. पोटात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्यादेखील उदभवू शकतात.
बनावट ड्रायफ्रुट्स कसे ओळखायचे?
ड्रायफ्रुट्स बनावट आहेत की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला लिटमस पेपरची आवश्यकता असेल. बाजारात लिटमस पेपर कमी किमतीत सहजपणे उपलब्ध असतात.
समजा, तुम्हाला काजूची चाचणी करायची असेल…
- तर प्रथम काजूच्या तुकड्यावर थोडे पाणी ओता.
- नंतर त्यावर लिटमस पेपर लावा.
- जर त्याचा रंग लाल किंवा नारिंगी रंगात बदलला, तर त्याचा अर्थ असा की, काजू बनविताना किंवा ते पॉलिश करण्यासाठी आम्ल वापरण्यात आले आहे. रंग बदलला नाही, तर सुका मेवा बनावट नाही, असे समजा.
