Identify Fake Turmeric Powder: भारतीय स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळद केवळ अन्नाचा रंगच नाही, तर चवही वाढवते. त्याशिवाय हळद आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. त्यात असलेले तत्व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. परंतु, हल्ली बाजारात भेसळयुक्त हळद मोठ्या प्रमाणात मिळू लागली आहे, जी चवीसह आरोग्यालाही हानी पोहोचवते. खरं तर हळदीमध्ये पिवळा रंग, स्टार्च यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात मिसळल्या जातात. अशा परिस्थितीत खरी आणि बनावट हळद ओळखणे खूप महत्त्वाचे ठरते.
बनावट हळद कशी ओळखावी?
पाण्याद्वारे चाचणी घ्या
तुम्ही पाण्याच्या चाचणीद्वारे हळद ओळखू शकता. त्यासाठी सर्वप्रथम एका ग्लासभर पाण्यात हळद पावडर घाला आणि काही वेळ थांबा. जर हळद शुद्ध असेल, तर ती पाण्याच्या तळाशी स्थिर होईल. दुसरीकडे जर पाण्याचा रंग गडद पिवळा झाला असेल, तर ती हळद भेसळयुक्त असू शकते.
वास घेऊन ओळखा
हळदीचा वास घेऊन तुम्ही त्यातील खरे-खोटेपणा सहज ओळखू शकता. खऱ्या हळदीचा वास ताज्या हळदीसारखा असतो; तर बनावट हळदीला अजिबात वास नसतो.
हळद तुमच्या हातावर घासून पाहा
तुमच्या हातावर थोडीशी हळद घासून पाहा. जर हळद शुद्ध असेल, तर ती तुमच्या हातावरून सहज निघून जाईल. परंतु, बनावट हळद तुमच्या हातावर डाग सोडेल.
आयोडीन चाचणी
आयोडीन चाचणीद्वारेही तुम्ही हळद ओळखू शकता. जर हळदीमध्ये स्टार्चची भेसळ केली गेली असेल, तर ती आयोडीनद्वारे शोधता येईल. हळदीमध्ये आयोडीनचे काही थेंब टाकल्यानंतर जर त्या हळदीचा रंग निळा किंवा काळा झाला, तर त्यात स्टार्च मिसळला गेलाय हे लक्षात येईल, जे हळदीतील भेसळीचे लक्षण आहे.
साबणाच्या मदतीने हळद तपासा
हळदीतील भेसळ साबणाच्या मदतीनेदेखील ओळखता येते. त्यासाठी प्रथम तुमच्या हातांवर हळद पावडर लावा. ती काही वेळ हातांवर घासून घ्या. आता हात साबणाने धुवा. जर हळदीचा रंग हातांवरून सहज निघत असेल, तर ती बनावट हळद असू शकते.