How To Effectively Clean Your White Shoes In Rainy Season : पावसाळ्याच्या दिवसात ऑफिस, कॉलेज किंवा कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडताच चिखल आणि पाण्यामुळे शूज खराब आणि त्यावर चॉकलेटी, पिवळे डाग दिसू लागतात. डाग तसेच राहिल्यामुळे चप्पल वा शूज इतर कुठेही घालून जायला विचित्र वाटते. अशा परिस्थितीत आपण घरी आल्यानंतर ते स्वच्छ करतो. पण, बाहेर असताना अचानक शूज स्वच्छ करणे कठीण जाते; तर तुम्ही पुढील काही गोष्टी तुमच्या बॅगेत ठेवा आणि चिंता दूर करा.

कोणत्या वस्तू बॅगेत ठेवायच्या आणि कशा वापरायच्या?

वेट वाइप्स टिश्यू

वेट वाइप्स टिश्यू हा सगळ्यात सोपा आणि लगेच वापरण्यात येण्याजोगा उपाय आहे. ओल्या वाइप्समध्ये धूळ, चिखल त्वरित काढून टाकण्याची ताकद आहे. जेव्हा तुम्हाला शूज किंवा चप्पलवर घाण दिसेल तेव्हा बॅगेतून लगेच वेट वाइप्स टिश्यू काढा आणि चिखल हळूवारपणे पुसून टाका. वेट वाइप्स टिश्यू फॅब्रिक, लेदर किंवा सिंथेटिक शूजवर तुम्ही वापरू शकता. पण असे वाइप्स निवडा, ज्यामध्ये जास्त रसायने नसतात आणि त्वचेसाठी सुरक्षित असतात; जेणेकरून तुमचे हात खराब होणार नाहीत.

जुना टूथब्रश किंवा लहान ब्रश

कधीकधी बुटांच्या कोपऱ्यात किंवा डिझाइनमध्ये घाण अडकून राहते आणि वाइपने ती काढणे कठीण असते. अशा कोपऱ्यांमधून घाण काढून टाकण्यास लहान ब्रश मदत करतो. प्रथम ओल्या वाइपने मोठी घाण काढून टाका. नंतर हट्टी डाग विशेषतः कडा किंवा सोलच्या वरच्या भागावर अडकलेली घाण, हळूवारपणे घासण्यासाठी ब्रश वापरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्रश हलका ओला करू शकता.

मायक्रोफायबर कापड किंवा मऊ रूमाल

वेट वाइप्स टिश्यूने चिखल आणि ब्रशने बुटांच्या कोपऱ्यात अडकलेली घाण काढून टाकल्यानंतर शूज सुकविण्यासाठी स्वच्छ, मऊ कापडाची आवश्यकता असते. मायक्रोफायबर कापड धूळ, ओलावा चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि चमकदेखील वाढवते. त्यामुळे ओल्या वाइप्स आणि ब्रशने तुमचे शूज स्वच्छ केल्यानंतर शूज कोरड्या मायक्रोफायबर कापडाने पुसून टाका; जेणेकरून ते सुकतील आणि त्यावर कोणतेही डाग राहणार नाहीत. चामड्याच्या शूजसाठीदेखील हे बेस्ट ठरेल, त्यामुळे कापड नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा आणि एका लहान प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्या.

एक लहान प्लास्टिकची पिशवी

जर तुमचे बूट खूपच घाण झाले असतील आणि तुमच्याकडे शूज स्वच्छ करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही एक लहान प्लास्टिकची पिशवी बॅगमध्ये ठेवून द्या आणि घरी पोहोचल्यानंतर स्वच्छ करा.

तर अशाप्रकारे तुमच्या ऑफिस किंवा कॉलेज बॅगमध्ये या छोट्या गोष्टी ठेवून, तुम्ही पावसाळ्यातही तुमचे बूट, चप्पल स्वच्छ आणि प्रेझेंटेबल ठेवू शकता.