Kidney Cancer Symptoms After 40: ४० वर्षांचा टप्पा म्हणजे अनुभव, परिपक्वता आणि आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची वेळ. या वयात अनेक जण हृदय, वजन आणि मधुमेह यांकडे लक्ष देतात; पण मूत्रपिंडांचं (Kidney) आरोग्य अनेकदा दुर्लक्षित राहतं. मात्र, हाच काळ आहे ज्या वेळी मूत्रपिंडाचा कर्करोग (Renal Cell Carcinoma) होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शरीर देत असलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका संभवतो.

नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व कर्करोग शल्यचिकित्सा तज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांच्या मते, मूत्रपिंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात अलक्षणीय राहतो. पण जसजसा हा विकार वाढतो, तसतसे शरीर काही धोकादायक संकेत देऊ लागते, जे वेळीच ओळखले, तर जीव वाचू शकतो.

मूत्रपिंडाचा कर्करोगाची दुर्लक्षित करू नका ‘ही’ लक्षणं…

१. मूत्रात रक्त (Hematuria) – मूत्राचा रंग लालसर किंवा तपकिरी दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे मूत्रपिंडातील गाठ किंवा ट्यूमरचे लक्षण असू शकते.

२. पाठीच्या एका बाजूला सतत वेदना – आराम घेतल्यानंतरही न जाणारी, एकाच बाजूला असलेली कंबरदुखी धोक्याचा इशारा ठरू शकते.

३. अकस्मात वजन घटणे – आहार किंवा जीवनशैलीत बदल न करता, वजन झपाट्याने कमी होत असेल, तर तो मूत्रपिंड किंवा इतर कर्करोगाचं संकेत असू शकतो.

४. सतत थकवा (Fatigue) – योग्य झोप घेऊनही थकवा जाणवत असेल, तर शरीरात काही गंभीर बदल होत आहेत का हे तपासून घेणं गरजेचं आहे.

५. पोट, पाय किंवा घोट्याला सूज येणे – हे लक्षण म्हणजे शरीरात पाणी साचू लागल्याने मूत्रपिंड व्यवस्थित कार्य करीत नाही याचा इशारा असतो.

६. वारंवार लघवी लागणे किंवा रात्री जास्त लघवी होणे (Nocturia) – ही सवय अचानक वाढल्यास तपासणी करून घ्यावी.

७. कारण नसताना ताप किंवा रात्री घाम येणे – सतत ताप येत असेल किंवा झोपेत घामाने अंग भिजत असेल, तर शरीराच्या या ‘सिग्नल’कडे दुर्लक्ष करू नका.

धोका कमी करण्यासाठी काय कराल?

डॉ. नगरकर यांच्या मते, काही जोखमीचे घटक (risk factors) बदलता येत नाहीत. जसे की. आनुवंशिकता किंवा कुटुंबातील इतिहास. पण, जीवनशैलीतील काही साधे बदल मोठा फरक घडवूून आणू शकतात.

  • वजन नियंत्रणात ठेवा – लठ्ठपणामुळे मूत्रपिंडावर ताण वाढतो. त्यामुळे संतुलित आहार आणि व्यायामाद्वारे वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
  • धूम्रपान थांबवा – तंबाखूचा वापर मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं सर्वांत मोठं कारण मानलं जातं.
  • दारूचे सेवन मर्यादित ठेवा – मद्याच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडांचं नुकसान होतं.
  • भरपूर पाणी प्या – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. त्यामुळे मूत्रपिंडांना मदत मिळते.
  • रक्तदाब नियंत्रणात ठेवा – सतत उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांवर ताण येतो आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

तज्ज्ञांचा इशारा

जर तुम्हाला वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणं सतत जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी केली, तर मूत्रपिंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो आणि उपचाराचे परिणामही चांगले मिळतात.

४० वर्षांनंतर शरीरात होणाऱ्या प्रत्येक बदलाकडे लक्ष द्या. कारण- कधी कधी शरीर ‘शब्दांशिवाय’ही सावध करतं आणि तोच इशारा जीवन वाचवू शकतो.