Kidney Health: तुमच्या स्वयंपाकघरात पौष्टिक पदार्थांचा साठा करणे हे उत्तम आरोग्याकडे पहिले पाऊल आहे. अनेक पदार्थ साखर आणि सोडियमयुक्त असतात. तुमच्या फ्रिजमध्ये नेमकं काय आहे आणि ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर तसंच लिव्हर, किडनी आणि हृदय यांसारख्या अवयवांवर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

नॅशनल किडनी फाउंडेशन ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, सध्या किडनीचे आजार वाढत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दोन प्रमुख कारणे आहेत. अशावेळी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्याने किडनीच्या आजाराची प्रगती रोखता येते किंवा मंदावते.

किडनीच्या आरोग्यासाठी काय खाऊ नये?

योग्य अन्नाची निवड करणे आणि साखर, फॅट, सोडियम आणि मीठाचे सेवन नियंत्रित करणे किडनीच्या आजारासाठी धोकादायक घटक टाळण्यास मदत करू शकते. हे बदल तुमच्या किडनीच्या संरक्षणास देखील बळकटी देऊ शकतात. त्यामुळे ते किडनीच्या आजारापासून एक महत्त्वपूर्ण संरक्षण ठरते. नॅशनल किडनी फाउंडेशनने पाच पदार्थांची यादी केली आहे, जे निरोगी व्यक्तींनीदेखील टाळले पाहिजेत.

सोड्यापासून दूर रहा

खाण्याच्या सोड्यामध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. त्यामध्ये साखर असते, नैसर्गिक असो वा कृत्रिम. साखर वजन वाढवू शकते. अनेक अभ्यासांमध्ये सोड्याचा संबंध ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, चयापचय सिड्रोम आणि दातांच्या समस्यांशी असलेले दिसून आले आहे. डाएट सोड्यामध्ये कॅलरीज कमी असू शकतात, मात्र त्यात पोषणाचा अभाव असतो. शिवाय त्यात कृत्रिम गोड पदार्थांसारखे पदार्थ असतात. म्हणून सोडा खाणे टाळा. जर तुम्हाला जास्त साधे पाणी पिण्यास त्रास होत असेल, तर व वाढवण्यासाठी ताज्या फळांचे किंवा लिंबाच्या रसाचे एक किंवा दोन तुकडे घाला.

प्रोसेस्ड मांस

प्रक्रिया केलेले मांस खाणे धोकादायक आहे. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी तुमच्या आहारातून प्रक्रिया केलेले मांस वगळा. प्रक्रिया केलेले मांस सोडियम आणि नायट्रेट्सचे स्त्रोतदेखील असू शकते. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून ताजे आण कमी फॅट असलेले मांस उत्पादने निवडा.

बटर

बाजारात उपलब्ध असलेल्या बटरमध्ये कोलेस्ट्रॉल, कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असते.त्यात अनेकदा ट्रान्स फॅट असते. म्हणून घरी बनवलेले शुद्ध तूप, बटर , कॅनोला किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा.

मेयोनिज

सँडविच, बर्गर आणि फ्राईजवर एक चमचा मेयोनिज टाकल्याने त्यांची चव वाढते, पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त एक चमचा मेयोनिजमध्ये १०३ कॅलरीज आण भरपूर सॅच्युरेटेड फॅट असते. कमी कॅलरी आणि फॅटी मेयोनिजदेखील आहे. मात्र त्यात सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यात अनेक अॅडिटिव्ह्ज असू शकतात. म्हणून त्याऐवजी फॅट फ्री ग्रीक दही वापरणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. त्यात प्रथिने जास्त असतात आणि ते सॅलडसोबत चांगले मिसळते.

साठवलेले अन्न

जगभरातील असंख्य अभ्यासातून असे दिसून आले की, प्रक्रिया केलेले अन्न टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढवतो, तर स्टोअर केलेला पिझ्झा आणि ग्रेव्हीसारख्या साठवून फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांमध्ये साखर, सोडियम आणि फॅटचे प्रमाण जास्त असू शकते. सर्व गोठवलेले जेवण सारखे नसले तरी शक्य असेल तेव्हा ताजे आणि संपूर्ण अन्न खाणे चांगले. साठवलेले जेवण निवडतानाही लेबल काळजीपूर्वक वाचा आणि कमी सोडियम किंवा सोडियम नसलेले साठवलेले अन्न निवडा.