Kidney Stone Symptoms: किडनी स्टोनचे रुग्ण देशात आणि जगभरात वाढत आहेत. चुकीचे खाणे-पिणे आणि वाईट जीवनशैलीमुळे ही समस्या कोणत्याही वयातील लोकांना होत आहे. किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करतो.
किडनीचं मुख्य काम रक्तातून विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकणं आणि रक्त शुद्ध करणं असतं. ती एक प्रकारे गाळणीसारखं काम करते, ज्यामुळे रक्त स्वच्छ आणि संतुलित राहतं. किडनी रक्तातलं सोडियम, कॅल्शियम आणि इतर खनिज पदार्थ (मिनरल्स) गाळून, त्यांना लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. पण जर हे घटक शरीरात जास्त प्रमाणात साठले, तर ते किडनीत साचून खडे (स्टोन) बनू शकतात.
नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, किडनी स्टोन आकाराने धान्याच्या दाण्यासारखा लहान असतो; पण तो खूप दुखणारा असतो. किडनीत हा स्टोन वाळूच्या कणासारखा छोटा किंवा गोल्फ बॉलइतका मोठाही असू शकतो. स्टोन जितका मोठा असेल, तितके त्याची लक्षणे अधिक त्रासदायक असतात. चला तर मग पाहूया किडनी स्टोन होण्याची कारणं कोणती आहेत आणि त्याची लक्षणं कशी ओळखावीत.
किडनी स्टोनची कारणं (Kidney Stones Reason)
१. पाणी कमी प्यायल्यानं किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. शरीरात पुरेसं पाणी न गेल्यानं लघवी गडद होते आणि त्यामुळे खनिज आणि क्षार एकत्र येऊन स्टोन तयार होतात.
२. जास्त मीठ, साखर व प्रोटीन असलेलं अन्न खाल्ल्यानं किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्यानं लघवीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं.
३. जास्त प्रमाणात साखर (जसं की फ्रुक्टोज) आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रोटीनचं (जसं की मांस आणि अंडी) सेवन केल्यानं युरिक अॅसिड वाढतं आणि किडनी स्टोनची समस्या होते.
४. किडनी स्टोनची कौटुंबिक इतिहास ही समस्या होण्यासाठी महत्त्वाची ठरते. जर कुटुंबात कोणाला पूर्वी स्टोनची समस्या झाली असेल, तर तुम्हालाही स्टोन होण्याची शक्यता जास्त असते.
५. काही आनुवंशिक आजार, जसे की सिस्टिन्यूरिया (Cystinuria) हेही स्टोन होण्याचं कारण असू शकतं.
६. लठ्ठपणामुळेही किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. जास्त वजन असलेल्या लोकांच्या लघवीत आम्लता (अॅसिडिक) वाढते, ज्यामुळे स्टोन होण्याची शक्यता वाढते.
७. काही वैद्यकीय समस्या जसे की सतत जुलाब होणे, लघवीच्या मार्गाचा संसर्ग (UTI), क्रोहन रोग व इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज (IBD) यांमुळे किडनीमध्ये स्टोन होऊ शकतो.
८. काही औषधं आणि सप्लिमेंट्स घेतल्यानेही किडनीत स्टोन होऊ शकतो.
किडनी स्टोनची लक्षणे काय आहेत? (Kidney Stones Symptoms)
Mayo Clinic अनुसार, पाठीमागे किंवा कंबरेच्या बाजूला वेदना होणं, कंबरेच्या खाली हलकी किंवा तीव्र अशी त्रासदायक वेदना जाणवू शकते. स्टोन हलल्यास हे दुखणं अधिक वाढू शकतं.
लघवीत बदल होणं, लघवीला दुर्गंध येणं किंवा ती धुरकट दिसणं, लघवीत रक्त येणं, लघवीचा रंग गुलाबी होणं, वारंवार लघवी होणं; पण कमी प्रमाणात होणं, लघवीचा रंग लाल किंवा तपकिरी होणं ही सगळी किडनी स्टोनची लक्षणं असू शकतात.
स्टोनमुळे मळमळ होऊ शकते आणि उलटीही होऊ शकते. जर कोणतंही स्पष्ट कारण नसताना उलटी किंवा मळमळ होत असेल आणि लघवीतही बदल दिसत असतील, तर ही किडनी स्टोनची लक्षणं असू शकतात.
किडनी स्टोनपासून बचाव कसा करावा? (How to prevent Kidney Stones?)
किडनी स्टोनपासून वाचायचं असेल, तर रोज भरपूर पाणी प्यावं. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्यानं किडनीचं काम सुरळीत चालू राहू शकतं.
मिठाचं सेवन नियंत्रित करा. प्रथिनंयुक्त आहार टाळा.
वजन नियंत्रणात ठेवा. आहारात साखर असलेलं पेय आणि गोड पदार्थ टाळा.
कोणतीही सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.